Swargate Bus Stand : पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध बस स्टॅन्डवर बसवले जाणार AI कॅमेरे

Swargate Bus Stand AI Camera
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Swargate Bus Stand । पुण्यातील स्वारगेट बस स्थानक हे अतिशय गजबजलेलं बस स्थानक म्हणून ओळखलं जाते. खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणचे प्रवासी पुण्यावरून गावी येताना स्वारगेट बस स्थानकावरच गाडीला बसतात. परंतु काही महिन्यापूर्वीच्या स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणामुळे या बस स्थानकाची इमेज खूपच डॅमेज झाली होती. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला होता. आता यावर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने स्वारगेट बस स्थानक परिसरात १५ ते २० कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित फेस डिटेक्शन कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वारगेट बस स्थानकात कोणी एंट्री केली… कोण कुठून बाहेर पडलं.. बसची वाट बघत कोण कोण प्रवासी थांबले होते त्या सर्वांच्या चेहऱ्याची ओळख पटवण्यास हे कॅमेरे सक्षम असतील.

प्रवाशांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता – Swargate Bus Stand

याबाबत एमएसआरटीसी पुणे विभागीय नियंत्रक अरुण सिया म्हणाले, “प्रवाशांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आम्ही तातडीने पावले उचलली आहेत. एआय-आधारित फेस डिटेक्शन कॅमेरे बसवण्याची निविदा प्रक्रिया पार पडली आहे. या कॅमेरा मुळे गुन्हेगारी व्यक्तीचा मागोवा घेण्यास मदत होईल. हे एआय आधारित फेस डिटेक्शन कॅमेरे स्वारगेट एसटी स्टँडच्या (Swargate Bus Stand) प्रत्येक महत्त्वाच्या झोनला कव्हर करतील, जेणेकरून कोणतेही ब्लाइंड स्पॉट शिल्लक राहणार नाहीत. प्रवाशांना सुरक्षित प्रवास देणे, त्यासाठीच एक चांगलं वातावरण तयार करणे, खास करून महिला प्रवाशांना स्वारगेट बस स्थानकात सुरक्षित वाटेल यावर आमचा भर आहे.

अरुण सिया पुढे म्हणाले की, एमएसआरटीसी पुणे पोलिसांशी समन्वय साधत आहे जेणेकरून सतत गस्त आणि सुधारित दक्षता सुनिश्चित केली जाईल, विशेषतः रात्रीच्या वेळी. याव्यतिरिक्त, कॅमेरा फीडचे निरीक्षण करण्यासाठी आणि एआय सिस्टमद्वारे निर्माण होणाऱ्या अलर्टच्या बाबतीत त्वरित कार्य करण्यासाठी प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याची योजना आहे.

एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे स्वारगेट बस स्थानकातून (Swargate Bus Stand) प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना मोठा आधार मिळाला आहे. तसेच यामुळे बलात्काराच्या घटनाही पुन्हा घडणार नाहीत अशी आशा आहे. दरम्यान, २६ फेब्रुवारीच्या पहाटे स्वारगेट डेपोजवळ उभ्या असलेल्या एसटी बसमध्ये एका २६ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली. याप्रकरणी दत्ता गाडे नामक आरोपीला ताब्यात घेतलं, सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्याची ओळख पटली. गाडे हा एक सिरीयल गुन्हेगार आहे, त्याच्यावर आधीच अनेक गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत, मात्र या एकूण घटनेने स्वारगेट बस स्थानकाच्या सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.