भारताच्या नद्यांना धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे, पण काही नद्यांमध्ये निसर्गाने अनोखी संपत्तीही दडवून ठेवली आहे. तुम्हाला माहिती आहे का, भारतात एक अशी नदी आहे जिथे पाण्यासोबत सोनं वाहतं? होय, ही नदी झारखंडमध्ये असून, येथे कुणीही जाऊन सोन्याचे कण गाळून कमाई करू शकतो.
हीच ती नदी जिथे पाण्यासोबत सोनं वाहतं
भारतभर हजारो नद्या आहेत, पण झारखंडमधील स्वर्णरेखा नदी विशेष आहे. कारण या नदीच्या वाळूत सोन्याचे कण सापडतात. झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशामधून वाहणारी ही नदी स्थानिकांसाठी एक अनोखे उत्पन्नाचे साधन आहे.
या नदीतून सोनं कुठून येतं? शास्त्रज्ञांनी यावर अनेक संशोधन केली, पण या रहस्याचा उलगडा आजवर कुणालाही करता आला नाही. काही भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, ही नदी जेथून वाहते त्या खडकांमध्ये सोनं असू शकतं आणि त्यातूनच हे कण वाहून येतात. मात्र, याला अजूनही कोणतेही ठोस पुरावे नाहीत.
नदीतून असे काढतात सोनं आणि करतात कमाई
स्वर्णरेखा नदीच्या किनारी पहाटेपासून लोक वाळू चाळून सोन्याचे कण शोधत असतात. अनेक पिढ्यांपासून स्थानिक लोक या नदीतून सोनं काढून आपला उदरनिर्वाह चालवतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या कामात गुंतलेले असतात.
स्वर्णरेखा नदीचे वैशिष्ट्ये
उगम : झारखंडमधील छोटा नागपूर पठारावरील नागदी गावातील विहिरीतून
लांबी : 474 किमी
वाहन मार्ग : झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा
अंतिम मुक्काम : बंगालचा उपसागर
स्वर्णरेखा नदीची उपनदीही आहे सोन्याची खाण
स्वर्णरेखा नदीप्रमाणेच करकरी नावाच्या उपनदीतही सोन्याचे कण आढळतात. स्थानिक लोक या दोन्ही नद्यांमधून सोने काढून विकतात. काही संशोधकांच्या मते, करकरी नदीतूनच स्वर्णरेखा नदीत सोनं वाहून येत असावं.
अजूनही गूढ
स्वर्णरेखा नदीत सोनं कुठून येतं, याचा उलगडा अजूनही झाला नाही. पण या नदीमुळे स्थानिक लोकांना रोजच्या खर्चासाठी आधार मिळतो. त्यामुळे ही नदी केवळ एक जलस्रोत नसून लोकांसाठी सोन्याची खाण आहे!