औरंगाबादची साखर आसाममध्ये वाढवणार गोडवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबादहून तब्बल दोन वर्षांनंतर आसाम राज्यातील गुवाहाटी जवळील अझारा येथे मालगाडीने साखरेची वाहतूक करण्यात आली. या मालगाडीने तब्बल 2 हजार 658 टन साखर पाठवण्यात आली. यामुळे रेल्वेला 63.17 लाख रुपयांचा महसूल मिळाला.

दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून शुक्रवारी पहिल्यांदाच एका दिवशी सहा मालगाड्या रवाना झाल्या. यात औरंगाबाद आणि दौलताबाद येथून रवाना झालेल्या दोन मालगाड्यांचा समावेश आहे. या मालगाड्यांमधून देशातील विविध भागात 15 हजार 195 टन मालवाहतूक करण्यात आली. यातून रेल्वेला 2.33 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. याबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापक भूपिंदर सिंग यांनी बिझनेस डेव्हलपमेंट टीमचा सत्कार केला.

औरंगाबादबरोबर परभणी येथून पश्चिम बंगाल राज्यातील दानकुनी येथे आणि वसमत येथून गुजरात राज्यातील चालठाण येथे साखर पाठवण्यात आली. दौलताबाद येथून जवाहरलाल नेहरू पोर्ट टर्मिनल येथे कंटेनर मधून 1 हजार 184 टन मालवाहतूक करण्यात आली. त्यातून रेल्वेला 6.14 लाख रुपये महसूल मिळाला. याचबरोबर नगरसोल येथून बिहारमधील फतवा येथे 3 हजार 364 टन कांदा पाठवण्यात आला.

Leave a Comment