सातारा | गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस दल अलर्ट झाले असून, गुरुवारी सायंकाळी सातारा शहरातील रेकॉर्डवरील गुंडांसह तब्बल 50 जणांना तडीपार करण्यात आले आहे. सातारा शहर पोलिसांनी याबाबतचे प्रस्ताव तयार करून तहसीलदार यांच्याकडे पाठवला असता त्यांनी कारवाई केली. त्यामुळे संशयितांना 10 दिवस सातारा तालुक्यात राहता येणार नाही.
गुरुवारी तहसीलदार आशा होळकर यांनी तात्पुरत्या तडीपारीबाबत महत्वपूर्ण आदेश देत 50 जणांना 10 दिवसांसाठी तडीपार केले. याबाबतची माहिती समोर आल्यानंतर गुन्हेगार क्षेत्रात खळबळ उडाली. बॅकफुटवर गेलेले पोलिस या कारवाईने पुन्हा फ्रंटवर आले. तडीपारीचे आदेश झाल्यानंतर शहर पोलिसांचा प्रतिबंधात्मक विभाग ऑर्डर बजावण्यासाठी तयार झाला. तात्पुरत्या तडीपारीमध्ये तानाजी बडेकर, अजय घाडगे, योगेश चोरगे, सनी भिसे, जावेद सय्यद, विकी अडसूळ, संजय माने, रोहित भोसले, विशाल बडेकर या संशयितांसह महागाव येथील सुमारे 13 जणांचा समावेश आहे.
तडीपार केलेल्या संशयितांना आजपासून गणेश् विसर्जन होईपर्यंत सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येण्यास बंदी राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी देखील तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारे फिरताना दिसल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.