कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
तडीपारीच्या आदेशाचा भंग करून गावातच फिरणाऱ्या सोळवंडे टोळीतील आरोपीला कराड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. कराड तालुक्यातील ओंड येथे मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. ओंकार युवराज थोरात असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी प्रद्युम्न ऊर्फ पद्या दिपक सोळवंडे (रा. कराड) यांच्यासह त्याच्या टोळील इतर साथिदारांना पोलीस अधिक्षकांनी 7 जुलै 2020 पासून 1 वर्षासाठी तडीपार केले होते. मात्र, या तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन सोळवंडे टोळील ओंकार थोरात हा त्याच्या ओंड या गावी फिरत असल्याची माहिती कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मिळाली. या माहितीनुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक दळवी, उपनिरीक्षक राजू डांगे तसेच गुन्हे शाखेचे पोलीस नाईक अमित पवार, शशिकांत काळे, अमोल हसबे, शशिकांत घाडगे यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
मंगळवारी दुपारी पोलीस पथक ओंडमध्ये पोहोचले असताना ओंकार थोरात हा त्याच्या घराच्या पाठीमागे उभा असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांना पाहताच त्याने तेथून पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. याबाबतची नोंद कराड ग्रामीण पोलिसात झाली आहे.