सातारा | प्रवासी म्हणून रिक्षा भाड्याने घेऊन कोंडवे परिसरातील चालकाला मारहाण करून लुटल्याप्रकरणी तडीपार गुंडाला शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी दि. 8 रोजी रात्री अटक केली. विपुल तानाजी नलवडे (वय- 21, रा. पिलेश्वरीनगर, करंजे) असे त्याचे नाव आहे. याबाबत सिराज अब्दुल कादर बागवान (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
रिक्षा चालकाला सोमवारी रात्री अकराच्या सुमारास राजवाडा येथून तिघांनी नेले होते. कोंडवे रस्त्यावर त्यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने मारहाण करून त्यांनी बागवान यांना जखमी केले. त्यानंतर मोबाईल, रोख रक्कम व रिक्षा असा एकूण 76 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी जबरदस्तीने लुटून नेला होता. त्यानंतर पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या.
त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पथक संशयितांचा शोध घेत होते. आज या गुन्ह्यातील संशयित सैदापूर कॅनॉल परिसरात फिरत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार कॅनॉलचे परिसरात पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. त्याने दोन साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. नलवडे हा तडीपार गुंड आहे. पोलिस निरीक्षक संजय पतंगे, सहायक पोलिस निरीक्षक अभिजित यादव, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, सचिन पवार यांनी ही कारवाई केली.