सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहर व वाई तालुक्यातील दोन टोळ्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही टोळ्यांवर घरफोडीसह जबरी चोरी, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. दोन्ही तालुक्यातील सहा जणांच्या टोळीला पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तडीपारीचे आदेश दिले.
तडीपार आदेशात सूरज राजू माने (वय- 22), तेजस संतोष शिवपालक (वय- 21, दोघे रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा), सनी ऊर्फ राहुल सुरेश जाधव (वय- 26), सागर सुरेश जाधव (वय – 24), अक्षय गोरख माळी (वय- 19), सारंग ज्ञानेश्वर माने (वय -22 , चौघे रा. सिद्धनाथवाडी, वाई) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सूरज माने व तेजस शिवपालक या दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरी, मारामारी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या दोघांचा तडीपारीचा प्रस्ताव तत्कालीन पोनि अण्णासाहेब मांजरे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवला होता. उर्वरीत चौघांवर वाई, पाचगणी, भुईंज पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. या संशयितांवर प्रामुख्याने घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
या दोन्ही टोळींना पोलिसांनी वेळोवेळी सुधारण्याची संधी दिली. मात्र त्यांच्यामध्ये सुधारणा न होता दिवसेंदिवस जनमाणसात त्यांची दहशत वाढत होती. यामुळे स्थानिक पोलिसांनी दोन्ही टोळींचे प्रस्ताव तयार करुन पाठवले. पोलिस अधीक्षक यांच्या प्राधिकरणासमोर सुनावणी झाली असता दोन्ही टोळींना सातारा जिल्ह्यातून 1 वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश करण्यात आला. याची तात्काळ अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.