Sunday, May 28, 2023

तडीपारीची कारवाई : उंब्रज, लोणंद पोलिस ठाणे हद्दीतील 6 जण 4 जिल्ह्यातून हद्दपार

सातारा | जिल्ह्यातील लोणंद व उंब्रज पोलीस ठाणे हद्दीमधील विविध ठिकाणी गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यामधील 6 जणांना सातारा, सांगली, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्यावतीने करण्यात आली.

लोणंद पोलीस ठाणे हद्दीत खून, दरोडा, जबरी चोरी, पेट्रोल चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे तसेच मालमत्तेविरुध्द गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या टोळीचा प्रमुख राकेश उर्फ सोन्या भगवान भंडलकर (वय- 21 रा. तांबवे ता. फलटण), सौरभ संजय जगताप (वय- 21, रा. सालपे ता. फलटण) यांना जिल्ह्यातून तडीपार करणेबाबत सपोनि विशाल वायकर यापूर्वीच प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक अजय बंसल यांनी सातारा, पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, भोर व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून हद्दपारीचे आदेश दिले.

उंब्रज पोलीस ठाणे हद्दीत खूना करीता अपहरण, गर्दीमारामारी तसेच अनेकांच्या जीवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाल्याने टोळीचा प्रमुख अक्षय शंकर पाटोळे (वय- 23 रा. पाटोळेवस्ती, शिरसवडी, ता. खटाव हल्ली रा. खडकपेठ मसुर ता. कराड), राहुल चंद्रकांत जाधव (वय- 21 रा. मसुर ता. कराड), शरद संजय चव्हाण (वय- 21, रा. मसुर ता. कराड), प्रसाद श्रीरंग जाधव (वय- 20, मसूर ता. कराड) यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबत उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड यांनी प्रस्ताव दाखल केले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस प्रमुख अजय बंसल यांनी एक वर्षाकरीता सातारा, सांगली जिल्हतील कडेगाव, खानापूर, वाळवा, शिराळा तालुका हद्दीपार करण्यात आले. वरील दोन्ही टोळीतील 6 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाचेवतीने अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सपोनि रमेश गर्जे, उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर, स्थागुशाचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पो.ना. प्रमोद सावंत, पो.कॉ. केतन शिंदे, कॉ. अनुराधा सणस यांनी या कारवाईत सहभाग घेतला.