निवडणूक फक्त आठ दिवसांवर, उमेदवारांच्या पायांना भिंगरी!

आठ दिवसांवर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणूक, गतिमान प्रचार यंत्रणा आणि उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधून वाड्या वस्तीवर राबवलेला प्रचार, हे सर्व चित्र सध्या संपूर्ण शाहूवाडी तालुक्यातील वाडी वस्तीवर पाहायला मिळत आहे. जोरदार प्रचार, जोडण्या, वाटाघाटी, फोडाफोडी जोडाजोडी अशा घटना ग्रामीण भागात गतिमान होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या रात्री जागु लागल्या आहेत. त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी आता ‘रात्रीस खेळ चाले..’ ही राजकीय जोडण्यांची मालिका पुढील आठ दिवस सुरू राहील.

‘गाव तिथे बियर बार’ घोषणा देत दारुबंदी जिल्ह्यातच उमेदवाराचा प्रचार

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आणि सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आणि उमेदवारांनी कंबर कसली आहे. राज्यात उमेदवारांच्या प्रचार सभांनाही सुरुवात झाली. एकीकडे आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी पक्षाचे दिग्गज नेते सभा घेत फिरत आहेत, तर दुसरीकडे कुणी सेलिब्रिटींची मदत घेत आहेत. निवडणुकीत चर्चेत राहण्यासाठी कोण काय करेल, याचा काहीही नेम नाही. चंद्रपूरच्या चिमूर मतदारसंघातही असंच काहीसं घडलं आहे. इथे अपक्ष उमेदवाराने प्रचारासाठी अजब शक्कल लढवली आहे. ज्या जिल्ह्यात दारुबंदी आहे, त्याच जिल्ह्यात या उमेदवाराने दारुला उघड समर्थन दिलं आहे.

वंचितच्या उमेदवाराचा ‘वचननामा’, चर्चा मात्र संपूर्ण राज्यभर

राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला हळूहळू जोर चढला असून राज्यातील प्रमुख पक्षांनी आपापले जाहीरनामे, वचननामे, वचकनामे आणि शपथनामे जाहीर करायला सुरुवात केली आहे. मात्र, राज्यात सध्या खमंग चर्चा आहे ती वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार किरण काळे यांच्या वैयक्तिक वचननाम्याची.

‘पंकजा मुंडे माझ्यावर नाराज नाहीत’ – आमदार मोनिका राजळे

शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ‘भाजपा’ने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांना मानणारा बराच मोठा वर्ग या मतदारसंघात आहेत. त्यातच गेल्या काही दिवसापासून आमदार राजळे यांच्यावर पंकजा नाराज असल्याची चर्चा चालू होती. मात्र, आज प्रचाराच्या शुभारंभावेळी पंकजा आपल्यावर नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उत्तर नागपूरच्या आ. मिलिंद मानेंना नागरिकांनी घेतले फैलावर

आज प्रचारादरम्यान मानेंना जनतेच्या विरोधाचा चांगलाच सामना करावा लागला. उत्तर नागपूर परिसरात भाजपाचे उमेदवार असलेले माने प्रचारासाठी गेले असता लोक त्यांच्यावर चांगलेच भडकले. यावेळी परिसरातील महिलांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांच्यावर पाण्याच्या प्रश्नाबाबत जाब विचारत प्रश्नांचा मारा करत ”मागील पाच वर्षे कोठे होता?” असा सवाल करण्यात आला. यामुळे माने चांगलेच भांबावल्याचे पहायला मिळाले. यावेळी परिसरातील नागरिकांना कार्यकर्त्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचे दिसून आले.

निवडणूक म्हणजे ‘हमखास रोजगार योजना’; घर सांभाळून महिलांचा रोजंदारीवर प्रचार

महिलांचे विश्व आता केवळ कुटुंबापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्यांनी केव्हाच घराचा उंबरठा ओलांडून आकाशाला कवेत घेतले आहे. सर्वच क्षेत्रात यशस्वी घोडदौड करणाऱ्या महिलांनी राजकीय क्षेत्रातही आश्वासक पावले टाकल्याची किती तरी उदाहरणे आहेत. राजकारण हा मध्यमवर्गीयांचा विषय नाही ही समजूतही आता कालबाह्य झाली आहे. याउलट बहुतांश निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका घेणाऱ्या महिलाही आता निवडणुकांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र, हा प्रचार केवळ आपल्या नेत्याच्या विजयाकरिता करण्यापुरता मर्यादित राहिला नाही आहे. तर निवडणूक दरम्यान दोन पैसे कमावता येऊन पोटाची खडगी भरता येईल हे ही त्यामागचे एक कटू सत्य आहे.

‘माझ्या विकासाच्या स्वप्नाला साथ द्या’ – आदित्य ठाकरे

मुंबईमध्ये कोल्हापूर भवनाची उभारणी करणार आणि पहिल्याच वर्षी रखडलेला आजरा तालुक्यातील आंबेओहळ प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गडहिंग्लज येथे केली. येथील म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या प्रांगणात शिवसेनेचे कागल विधासभेचे उमेदवार संजय घाटगे आणि चंदगड विधानसभेचे उमेदवार संग्रामसिंह कुपेकर यांच्या एकत्रित प्रचाराचा शुभारंभ ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना ठाकरे यांनी ‘माझे साथी आणि सोबती’ म्हणून दोघांना निवडून विधानसभेत पाठवा असे आवाहन उपस्थितांना केले.

‘मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा नाही’ – चंद्रकांत पाटील

‘निवडणुकीपूर्वी पक्षाने राज्यातील सर्व जागांचे सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणानुसार कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, असे मला सांगण्यात आले. निवडणूक लढवीत असलो तरी मुख्यमंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा मला नाही,’ असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले.

आघाडीच्या फक्त ४० जागा निवडून येतील; चंद्रकांत पाटील यांचे भाकीत

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादी वर टीकास्त्र सोडले आहे. ‘येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेस , राष्ट्रवादी आघाडीच्या फक्त ४० जागा असतील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ही त्यांना मिळणार नाही’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

वंचित उमेदवाराचा एसटीत ‘चालता बोलता’ प्रचार

जिल्ह्यातील जिंतूर व सेलु मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनोहर वाकळे यांनी आज येलदरी ते जिंतूर पर्यंत चक्क बसने प्रवास करत चालता बोलता प्रचार केला. प्रवासादरम्यान वाकळे यांनी बस मधील प्रवाश्यांच्या समस्या जाणून घेत ,येणाऱ्या काळात आपण ह्या सर्व अडी अडचणी दूर करु असे आश्वासन दिले .त्याच बरोबर माध्यमांशी बोलतांना ,रस्त्याचे प्रश्न फार गंभीर झाले असून यावर तोडगा काढण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, त्याचबरोबर मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची १९ वर्षांची नौकरी सोडून, समाजसेवेसाठी आपण पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.