कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
वटवाघळातून पसरणारा निपाह हा व्हायरस महाबळेश्वरच्या जंगलातील गुहेमध्ये असलेल्या वटवाघळांमध्ये सापडल्याचा दावा पुणे येथील नॅशनल इन्स्टिटयुट ऑफ वायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. तसा अहवाल त्यांनी प्रसिध्दही केला आहे. यानंतर आता कराड येथेही मोठ्या संख्येने असलेल्या वटवाघळांच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना बुधवारी निवेदन दिले आहे. तसेच येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वटवाघळांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही केली आहे.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, शहराध्यक्ष सागर बर्गे, नितीन महाडिक आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. मनसे पदाधिकाऱ्यांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, कराड येथील प्रितीसंगम बागेतील झाडांवरती फार मोठया संख्येने वटवाघुळे आहेत. वटवाघुळ या प्राण्यापासून अनेक रोग पसरत असतात. संपूर्ण जगामध्ये ज्या कोरोना आजाराने थैमान घातले आहे. हा आजार ही वधवाघुळ या प्राण्यापासून झाल्याचे जागतीक शास्त्रज्ञ सांगत आहेत. नुकतेच सातारा जिल्हयातील महाबळेश्वरच्या एका गुहेतील दोन वट वाघुळांमध्ये “निपाह’ हा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे अशाच प्रकारचे काही आजार कराड व परिसरातील नागरिकांना या वटवाघुळांपासून होण्याची शक्यता आहे. याची खबरदारी म्हणून प्रितीसंगम बागेतील
वटवाघुळे यांचा त्वरीत बंदोबस्त करावा.
कराडातील लोकांचे आरोग्य सांभाळणे हे कराड पालिकेचे प्रथम कर्तव्य आहे. प्रितीसंगम बागेजवळ दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिस्थळ असून या ठिकाणी अनेक नागरीक येत असतात. तसेच या ठिकाणी पहाटे व्यायामाकरीता अनेक लोक येतात. त्या सर्वांचे आरोग्याचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. वट वाघुळ हा प्राणी कोणत्याही सौंदर्याचे प्रतिक नाही किंवा त्यापासून कोणत्याही गोष्टीचा समाजाला फायदा नाही. त्यामुळे अशा घातक प्राण्यांना हटविणे गरजेचे आहे. प्राणी मित्र संघटनांनीही वट वाघुळांपासून होणारे उपद्रव्य टाळणेसाठी सहकार्य करणे तितकेच गरजेचे आहे. कारण घातक प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राण्यांची सदरच्या काळात काळजी घेणे अत्यावश्यक आहे. सदरील वट वाघुळांचा बंदोबस्त करुन त्यांना योग्य अशा ठिकाणी स्थालांतरीत करणेत यावे.