बारमालकांच्या प्रश्नांची दखल घेतली आता शेतकऱ्यांनाही मदत करा : भाजपच्या ‘या’ खासदाराचं थेट पवारांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने सर्वत्र लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या उद्योग धंद्यांना याचा फटका बसला आहे. यामध्ये बार व हॉटेल व्यावसायिकांनाही नुकसान सहन करावे लागले. त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी पत्र लिहीत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी केली. या मागणीवरून आता भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी थेट राष्ट्रवादीचे खासदार पवार यांना पत्र लिहले आहे.

“बारमालक व हॉटेल मालकांच्या प्रश्नांची दखल घेत घेतली तशी काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत करावी, अशी मागणी खडसे यांनी पत्राद्वारे केली आहे. या पत्रात त्यांनी आजच्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्य शेतकरी यांनाही नुकसान सहन करावं लागत आहे. त्यांच्या शेतीच्या मालाला हि भाव नाही. केंद्र सरकारने जसे आर्थिक मदतीचे पॅकेज दिले त्याप्रमाणे राज्य सरकारनेही देणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारने तसे केले नाही.

अगोदरच अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेती उत्पादनाचे प्रचंड नुकसान होत असून उभी पिके नष्ट करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून राज्य सरकारने जिल्हाबंदी केली आहे. त्यांच्या या जिल्हाबंदीच्या निर्णयामुळे शेतमालाची वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे. शिवाय कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. शेतमाल असूनही तो विकत येत नसून घरखर्च चालविण्यासाठी पाहता पैसेच नसल्यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी राज्याच्या अर्थमंत्र्यांनी एक घोषणा केली होती, ती म्हणजे शेतकऱ्यांना थकित वीजबिलात ३३ टक्के सवलत देण्यात येईल. मात्र, ती अजूनही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेली नाही. दुष्काळी मदत आणि पिकविम्याच्या योजना शेतकऱ्यांपासून लांबच आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे कोणतेही नियोजन राज्य सरकारने केलेले नाही. लॉकडाऊनमुळे जेव्हा इतर सर्व उद्योगधंदे बंद होते, तेव्हा शेतकरी मात्र, शेतात राबून पिके घेत होता.

लॉकडाऊनच्या काळातही शेती व शेतीपूरक उद्योगच ग्रामीण कुटुंबांसाठी आधार असल्याने राज्य सरकारने अन्य उद्योगंधंद्यांप्रमाणे शेतकऱ्यांसाठीही पॅकेज जाहीर करावे. ज्याप्रमाणे आपण बार व हॉटेल मालकांच्या प्रश्नांची दखल घेतली. त्याप्रमाणे सर्व सामान्य शेतकरी, मजूर, बारा बलुतेदार, हातावर पोट असलेल्या कष्टकरी कुटुंबांचा आक्रोशही महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते या नात्याने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Leave a Comment