काबुलमध्ये ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देणाऱ्या आंदोलकांवर तालिबानचा गोळीबार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

काबुल । अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. येथे पाकिस्तानविरोधी रॅलीमध्ये जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी तालिबान लढाऊंनी गोळीबार केला. मात्र, या गोळीबारात सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 70 हून अधिक लोकं काबूलमधील पाकिस्तानी दूतावासाच्या बाहेर निदर्शने करत होते. यामध्ये मोठ्या संख्येने महिलांचाही सहभाग होता. या निषेधाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात निदर्शकांकडून ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘पंजशीर जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या जात असल्याचे ऐकण्यात आले.

काबुलमधील स्थानिक पत्रकारांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शेकडो अफगाणी पुरुष आणि स्त्रिया पाकिस्तान विरोधी बॅनर घेऊन “आझादी, आझादी” आणि “पाकिस्तान की मौत”, “आयएसआय की मौत” अशा घोषणा देताना दिसतात.

किंबहुना, पंजशीर युद्धात तालिबानच्या ड्रोन हल्ल्यामुळे आणि ISI चे प्रमुख फैज हमीद यांच्या काबूल भेटीमुळे अफगाणी संतापले आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायानेही त्यावर टीका केली आहे. अफगाणिस्ताची लोकं काबूलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने करत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून अफगाणिस्तानच्या विविध शहरांमध्ये महिला त्यांच्या हक्कांसाठी निदर्शने करत असल्या तरी काबूलमध्ये पहिल्यांदाच रात्री निदर्शने झाली आहेत. काबूल व्यतिरिक्त अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्येही रॅली काढून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. लोकांनी पाकिस्तानवर नव्याने बंदी घालण्याची मागणी केली आहे.

अहमद मसूद, जे नॅशनल रेजिस्टेंस फोर्स (NRF) म्हणजेच नॉर्दर्न अलायन्सचे पंजशीरमध्ये नेतृत्व करत आहेत, त्यांनीही असे म्हटले आहे की पाकिस्तान हवाई दल सतत हल्ले करत आहे, जेणेकरून तालिबान पुढे जाऊ शकेल. आता आपली खरी लढाई पाकिस्तानशी आहे, कारण पाकिस्तानी लष्कर आणि ISI या युद्धात तालिबानचे नेतृत्व करत आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अनेक वेळा पाकिस्तान तालिबानला सर्व प्रकारची मदत पुरवत असल्याचे म्हटले होते. तालिबान केवळ पाकिस्तानच्या मदतीनेच अफगाणिस्तान काबीज करू शकला.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे (ISI) प्रमुख फैज हमीद काबुलच्या दौऱ्यावर गेले होते, तर दुसरीकडे तालिबानच्या खांद्याला खांदा लावून त्यांची स्पेशल बटालियन नॅशनल रेजिस्टेंस फोर्सच्या (NRF) योद्ध्यांचा नाश करत आहे. यामुळे जगभर पाकिस्तानविरोधात संताप निर्माण झाला आहे.सोशल मीडियावर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय बंदी लागू करण्याची मागणी होत आहे. लोकं याला ‘पाकिस्तानचे पांजशीरमधील पाप’ म्हणून युद्ध अपराध मानत आहेत.

Leave a Comment