हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणपतीचं आगमन झाल्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव एवढ्या जोशात साजरा करता येत नाहीये, त्यामुळे मूर्तींच्या उंचीवरही निर्बंध आले आहेत. गणपतीच्या उंचीच्या बाबतीत बोलायचं झालं, तर तुम्हांला आश्चर्य वाटेल परंतु जगातली गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती भारतात नसून थायलँड मध्ये आहे.
थायलंडच्या ख्लॉन्ग ख्वान्ग शहरामध्ये जगातली सगळ्यात मोठी गणपतीची मूर्ती आहे. या शहरामध्ये गणेश इंटरनॅशनल पार्क बनवण्यात आलं आहे, तिकडेच ही ३९ मीटर उंच गणपतीची मूर्ती आहे. गणपतीच्या मूर्तीच्या डोक्यावर कमळाचं फूल आणि त्यामध्ये ओम लिहिलं आहे गणपतीच्या मूर्तीसह हे पार्क बनवायला २००८ ते २०१२ अशी ४ वर्ष लागली. थायलंडमध्ये जी ४ फळं पवित्र मानली जातात, त्या फळांना गणपतीच्या हातात ठेवण्यात आलं आहे. यामध्ये फणस, आंबा, ऊस आणि केळी यांचा समावेश आहे.
थायलंडमध्ये आंब्याला समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. गणपतीच्या पोटावर सापाने वेटोळे घातले आहेत, तर बाप्पाच्या सोंडेमध्ये लाडू आणि पायाखाली उंदीर आहे. थायलंडमध्येही गणपतीला ज्ञान आणि बुद्धीमत्तेची देवता म्हणून मानलं जातं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’