कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
दरवर्षी कराड तालुक्याला पुराचा फटका बसतो. मोठ्याप्रमाणात कृष्णा, कोयना नद्यांना पूर आल्यानंतर शहरात पाणी शिरते. पावसाळा जवळ आल्याने पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंदा प्रशासनाकडून लवकर तयारी केली जात आहे. जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी दिलेल्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन विभाग सध्या अलर्ट झाला असून या विभागाकडून मंगळवारी कराड येथील कृष्णा व कोयना नदी पात्रात नदीकाठची पाहणी करण्यात आली. तसेच आपत्तीकाळात वापरण्यात येत असलेल्या बोटींची चाचणीही घेण्यात आली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशानुसार मंगळवारी दुपारी कराडचे नायब तहसीलदार आनंदराव देवकर, मंडलाधिकारी महेश पाटील, तलाठी संजय जंगम, अग्निशामक दलाचे माने, विनोद काटरे, महसूल विभागातील कर्मचारी यांनी कृष्ण व कोयना नदी पात्रात आपत्ती व्यवस्थापन विभागातील साहित्य व बोटींची तपासणी केली. तसेच बोटीतून नदीकाठची पाहणीही केली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कराडला आवश्यक साहित्ये देण्यात आलेली आहेत.
कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे व तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या सूचनेनुसार तालुका आपत्ती व्यवस्थापनाच्यावतीने नदीपात्रांची पाहणी करण्यात आली. गेल्यावर्षीप्रमाणे यंदा कराड शहरात पुराचे पाणी शिरू न देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग व प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात पुराचा फटका कराड तालुक्याला बसतो. यंदाही पावसाळ्यातील संभाव्य पुरस्थितीचा धोका लक्षात घेत जुलैच्या शेवटच्या आठवड्यात एनडीआरफची टीम कराडला दाखल होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.