Tanaji Sawant : मंत्री तानाजी सावंत यांचा शेतकऱ्यांना दम; म्हणाले, औकातीत राहून बोलायचं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत राहणारे शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी थेट शेतकऱ्यांना दम देऊन त्यांची औकात काढली आहे. शेतकऱ्यांनी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासंदर्भात प्रश्न विचारताच तानाजी सावंत यांनी थेट शेतकऱ्याची औकात काढली. तसेच सुपारी घेऊन इथे बोलायचं नाही असा दम सुद्धा दिला. तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांसोबतच (Farmers) अशा प्रकारची भाषा वापरल्याने याचे मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

नेमकं घडलं काय?

धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा विधानसभा मतदारसंघातील व वाशी या तालुक्यातील डोंगरवाडी गावात तानाजी सावंत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी सावंत यांना पाणीपुरवठ्याबाबत प्रश्न विचारला. मात्र तानाजी सावंत हे संतापल्याचे पाहायला मिळालं. सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत. सगळ्यांनी आपापल्या औकातीत राहून बोलायचं आणि आपल्या औकातीत विकास करून घ्यायचा. मी ऐकून घेतोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलणार आणि मी ऐकणार. कुणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही असं तानाजी सावंत शेतकऱ्यांना म्हणाले.

अमोल मिटकरींची टीका –

तानाजी सावंत यांनी थेट शेतकऱ्यांचीच औकात काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी त्यांच्यावर चौफेर टीका केली. बैलपोळा सणाच्या तोंडावर बळीराजाला औकात दाखवण्याची भाषा करणाऱ्या करणे म्हणजे तानाजी सावंत यांनी स्वतःची औकात दाखवण्यासारखं आहे. तानाजी सावंत यांनी लवकरात लवकर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची माफी मागावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तानाजी सावंत यांना आता तरी त्यांची औकात दाखवणार आहेत का? मुख्यमंत्र्यांनी सावंतांवर कारवाई केली नाही तरी महाराष्ट्रातील शेतकरी सावंतांना त्यांची औकात दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं म्हणत अमोल मिटकरी यांनी तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा तानाजी सावंत यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीचे नव्हे तर महाराष्ट्राचे नुकसान होईल असं कोणतेही वक्तव्य करू नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत याना समज दिली असेल असं मुनगंटीवार यांनी म्हंटले.