भूम परंडा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत यांची आमदारकी धोक्यात??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खेकड्यांच्या पोखरण्याने धरण फुटलं… ते त्या हापकिनकडून औषध घेणं बंद करा… या आणि अशा अनेक स्टेटमेंटने नेहमीच चर्चेत राहणारं नाव म्हणजे तानाजी सावंत (Tanaji Sawant)… शिंदेंच्या बंडात फ्रंटला असणाऱ्या या नावाने ठाकरेंचा, पत्रकारांचा, विरोधकांचा… अगदी जमेल आणि मिळेल तसा रोखठोक समाचार घेतला… पण हेच सावंत सध्या ज्या आमदारकीच्या जीवावर मंत्रिपद मिरवतायत त्याच भूम परंडा मतदार संघात सावंत साहेब सध्या रेड झोन मध्ये आहेत… बंडाळी करून मंत्रीपद दिमाखात मिरवणाऱ्या सावंतांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी आता राहुल भैया फिरसे… या घोषणेच्या… नावाच्या… मागे ठाकरे – पवारांनी ताकद लावायला सुरुवात केलीय…

खरंतर राष्ट्रवादीतून राजकारणाची बाराखडी गिरवणाऱ्या तानाजी सावंतांना पुढचं भविष्य दिसत नसल्यामुळे त्यांनी 2016 च्या आसपास शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतला… अगदी कमी कालावधीत सावंत उद्धव ठाकरेंच्या खास मर्जीतले बनले… त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं… इतकच काय तर फडणवीस – ठाकरे सरकारमधील शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात सावंतांना कॅबिनेट मंत्री पदही देण्यात आलं… यावरून ठाकरेंचा सावंतांवर डोळे झाकून किती विश्वास होता? याचा अंदाज आपल्याला येतो… पण तानाजी सावंतांना जनतेतून निवडून जाण्याची इच्छा होती…. म्हणूनच 2019 ला त्यांना शिवसेनेकडून भूम परंड्याची उमेदवारी देण्यात आली….

YouTube video player

तसं पाहायचं झालं तर धाराशिवचा भूम परांडा मतदार संघ हा राष्ट्रवादीचा पारंपारिक बालेकिल्ला… राहुल मोटे यांनी सलग तीन टर्म भूम परंड्याची आमदारकी आपल्याकडे ठेवून नवा रेकॉर्ड तयार केला होता… अगदी 2014 ची मोदी लाटही मोटेंच्या विजय घोडदौडीला रोखू शकली नाही… फक्त 1995साली शिवसेनेकडून ज्ञानेश्वर पाटलांनी याच मतदारसंघात आमदारकी मिळवत, भूम परंड्यात शिवसेनेला बेस मिळवून दिला होता… इतकंच काय तर तालुक्याच्या राजकारणात सावंत बंधूंना स्पेस मिळवून देण्यात ज्ञानेश्वर पाटलांनीच मदत केली… राहुल मोटे आमदार असताना ज्ञानेश्वर पाटलांनी सत्ता नसूनही मतदार संघावरची पकड तसूभरही ढळू दिली नाही… पण उमेदवारी मिळून सुद्धा त्यांना विधानसभेला मोटेंना मात काही देता येत नव्हती… पण या सगळ्या राजकारणाच्या दरम्यान तानाजी सावंतांनी थेट मातोश्रीशी संधान बांधून संपर्कप्रमुख, उपनेते असं करत थेट विधान परिषदेची आमदारकीही पदरात पाडून घेतली… यापुढे जाऊन फडणवीस ठाकरे सरकारच्या शेवटच्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रीपदाचीही माळ पदरात पाडून घेतली…

अगदी सिस्टिमॅटिक खेळलेल्या या चालींमुळे मतदार संघात शिवसेनेचा चेहरा म्हणून तानाजी सावंत फ्रंटला आले…. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटलांचं राजकारण मागे पडलं… एवढंच नाही तर पाटलांना डावलून 2019 ला भूम परंडा मतदारसंघातून शिवसेनेचं तिकीट मिळवण्यातही सावंतांना यश आलं…. त्यामुळे 2019 ला आमदारकीचा रेकॉर्ड ब्रेक करणारे राष्ट्रवादीचे राहुल मोटे विरुद्ध शिवसेनेकडून तानाजी सावंत असा अटीतटीचा सामना झाला…. 15 वर्ष आमदार असूनही रखडलेली विकास काम, पाणी प्रश्न, जनतेच्या जगण्या मरण्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांना न्याय देण्यात मोटे सपशेल फेल ठरले… तर दुसऱ्या बाजूला सावंत यांनी शिवजल क्रांतीच्या माध्यमातून केलेली सिंचनाची कामे, नदी नाला खोलीकरण, सामूहिक विवाह सोहळे, दुष्काळात केलेली सामान्यांना मदत, चारा छावणी यासह साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेला आधार त्यामुळे सावंतांना मोठा जनाधार मिळाला… आणि राष्ट्रवादीचा झालेला भूम परंड्याचा बालेकिल्ला सावंतांच्या रूपाने पुन्हा शिवसेनेला मिळाला…

तानाजी सावंत भूम परंड्याचे आमदार झाले… पण ठाकरेंनी ज्या सावंतांवर विश्वास टाकला… आमदारकी दिली… त्याच सावंतांनी शिंदेंच्या बंडात सहभागी होत अक्षरशः यु टर्न घेतला… शिंदे गटाची बाजू मांडताना त्यांनी ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केलेच पण त्यांच्या क्रेडिबिलिटीवरतीही शंका उपस्थित केली…. याचं फळ त्यांना कॅबिनेट मंत्रीच्या स्वरूपात मिळालं खरं… पण पुढचं राजकारण त्यांच्यासाठी गुंतागुंतीचं झालं त्याचं काय? गद्दारीचा लागलेला टॅग, मंत्रीपदावर असताना वादग्रस्त वक्तव्यांनी ढासळलेली इमेज आणि आक्रमक स्वभावाचा तोटा हे सगळं पाहता भूम परंड्याची जनता ही विद्यमान आमदार सावंत साहेबांवर चांगलीच नाराज आहे, हे वेगळ्या शब्दात सांगायला नको…. म्हणूनच की काय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही ठाकरेंच्या उमेदवाराला म्हणजेच ओमराजे निंबाळकरांना याच भूम परंडा मतदारसंघाने सर्वात मोठं लीड दिलंय… यावरून स्पष्ट होतं की सावंतांना यंदा भूम परंडा पुन्हा एकदा विधानसभेवर काही पाठवत नसते…

एमआयडीसी नसणं…पर्यायाने रोजगार नसणं… यासोबतच रखडलेले जलसिंचन प्रकल्प आणि शेतकऱ्यांचे पिक विमा याही गोष्टींची पूर्तता विद्यमान आमदार साहेब पूर्ण करू शकले नसल्यामुळे आणि बंडाळीमुळे सावंतांच्या विरोधात वातावरण आहे हे तर क्लिअर कट सांगता येऊ शकतं… बाकी लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेलं 81 हजारांचं भलं मोठं लीड पाहता तिन्ही घटक पक्षांतील इच्छुकांना आमदारकीची स्वप्न पडू लागलीयेत… शरद पवार गटाकडून राहुल मोटे यांचं नाव यात सर्वात जास्त आघाडीवर आहे… तर ठाकरेंकडून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनीही विधानसभेची तयारी केलीये… दुसऱ्या बाजूला तानाजी सावंत मुळात भूम परंड्यातून निवडणूक लढवतील का? यावरच मोठी शंका उपस्थित केली जातीये… ते मतदारसंघात फिरकत तर नाहीच… पण श्रीकांत शिंदे यांचे वर्गमित्र असणारे डॉ. राहुल घुले यांची मतदार संघातील लगबग, धावपळ आणि गाठीभेटी पाहता शिंदे गटाकडून राहुल घुले यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब शकतो…

एका वाक्यात सांगायचं झालं तर इच्छुकांची याही टर्मला भूम परांडा विधानसभा मतदारसंघात भाऊ गर्दी असली तरी वारं मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, एवढं मात्र नक्की… बाकी ज्यानं निवडून दिलं तोच मतदारसंघ रिस्की बनल्यामुळे आता तानाजी सावंत निवडणूक लढवण्याची रिस्क घेणार का? सावंत नसतील तर भूम परंड्याचा मतदार संघात मशालीचा की तुतारीचा उमेदवार आमदारकीचा गुलाल उधळतोय? तुम्हाला काय वाटतं? भूम परंड्याचा यंदाचा आमदार कोण होतोय? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.