हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषीराज सावंत (Hruturaj Sawant) सोमवारी पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यांच्या अचानक गायब होण्यामुळे सावंत यांचे कुटुंबही चिंतेत पडले होते. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि काही तासांतच ऋषीराज सुरक्षितपणे परत आल्याची माहिती पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
ऋषीराज सावंत अचानक गायब झाल्याची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने आपला तपास सुरू केला होता. या तपासात समोर आले की, ऋषीराजने पुणे विमानतळावरून एक खासगी विमान बुक करून थेट बँकॉकला पळ काढला होता. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना याची कल्पना नव्हती, त्यामुळे त्यांना ऋतुराजचे कोणीतरी किडनॅपिंग केले आहे असे वाटले. यानंतर पोलिसांनी तत्काळ विविध यंत्रणांशी संपर्क साधून या खासगी विमानाचा मागोवा घेतला. काही तासांच्या शोधानंतर पोलिसांनी ऋषीराज यांचे विमान माघारी बोलावून घेतले. यावेळी ऋतुराज आणि त्याचे दोन्ही मित्रांना सुखरूप होते.
या संपूर्ण घटनेविषयी माहिती देत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, “ऋषीराज सावंत आणि त्यांचे मित्र हे खासगी विमानाने बँकॉकला रवाना झाले होते. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना याची कल्पना नसल्याने त्यांनी तक्रार नोंदवली होती. त्यामुळे तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर आम्ही सर्व संबंधित यंत्रणांशी संपर्क साधला आणि ऋषीराज यांना सुरक्षित परत आणले”
दरम्यान, या घटनेबाबत प्रतिक्रिया देत तानाजी सावंत यांनी म्हटले आहे की, “मुलासोबत आमचे काहीही वाद झाले नव्हते. त्याच्या सोबत त्याचे मित्र होते. त्यामुळे अपहरण झाले असे म्हणता येणार नाही. मात्र, तो घरच्यांना न सांगता गेला हे नक्कीच चिंतेचे कारण होते. आता तो सुखरूप परतला आहे, त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. यामागील नेमके कारण समजण्यासाठी आम्ही त्याच्याशी चर्चा करू.” महत्वाचे म्हणजे, घडलेल्या या प्रकारासंबंधी ऋषीराज आणि त्याच्या मित्रांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून ऋतुराजने असे पाऊल का उचलले याविषयी माहिती मिळवू शकतो.