चंदेरी दुनिया । आगामी ‘तानाजी’ या चित्रपटात तानाजी मालुसरे यांना साखळदंडाने बांधल्याचे दाखविणारे दृश्य आहे. या दृश्यावर तानाजी मालुसरे यांचे १४ वे वंशज प्रसाद मालुसरे यांनी आक्षेप घेतला आहे. आतापर्यंतच्या तानाजी मालुसरे यांच्या इतिहासात अशाप्रकारचा कोठेही उल्लेख नाही. त्यामुळे चित्रपटातील हा भाग वगळण्यात यावा अशी मागणी प्रसाद मालुसरे यांनी केली.
प्रसाद मालुसरे म्हणाले, “तानाजी या चित्रपटात दाखविण्यात येणारा इतिहास हा तानाजी मालुसरे यांचा इतिहास म्हणून यापुढील काळात ओळखला जाईल. तानाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यात तानाजी मालुसरे यांचे हात साखळदंडाने बांधलेले दाखविण्यात आले आहे. पण आतापर्यंतच्या तानाजी मालुसरे यांच्या इतिहासात अशाप्रकारचा प्रसंग कुठेही वाचण्यात अथवा ऐकण्यात आला नाही”. त्यामुळे हा प्रसंग या चित्रपटातुन वगळण्यात यावा अशी मागणी प्रसाद यांनी केली.
तसेच या चित्रपटात इतर कुठले आक्षेपार्ह दृश्य नाहीत याची खातरजमा करण्यासाठी प्रदर्शित होण्यापूर्वी हा चित्रपट मालुसरे यांच्या वंशजांना दाखविण्यात यावा अथवा चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्यास द्यावी अशी मागणीही प्रसाद मालुसरे यांनी केली.