मराठ्यांच्या आक्रमकतेचा ऐतिहासिक चरित्रपट – तान्हाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चित्रपट परीक्षण | द्रिशिका पंडीत

आधी लगीन कोंढण्याचं मग माझ्या रायबाचं..

ज्या मावळ्याच्या घरात लग्न आहे त्याला आम्ही जीवाशी खेळ खरायला युद्धात कशाला पाठवू..?

गड आला पण सिंह गेला..!!

महाराष्ट्रात राहून मराठी माध्यमात शिकलेल्या प्रत्येक व्यक्तीला वरील तीन वाक्यांवरूनच प्रसंग कोणता आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. शूर मराठा सरदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या तानाजी मालुसरेंची गोष्ट म्हणजे ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी’ चित्रपट. स्वतःच्या मुलाचं लग्न असतानाही युद्धावर जाण्याची तयारी दाखवणारा, स्वतः धारातीर्थी पडलेला असतानाही कमी सैन्याच्या जोरावर कोंढाणा किल्ला वाचवणारा सरदार म्हणून तानाजी मालुसरे परिचीत आहेत. याच तानाजी मालुसरेंचा इतिहास भव्यदिव्य स्वरूपात आज लोकांसमोर आणण्यात आला.

इतिहासपट हे जुन्या आठवणींना उजाळा देण्यासोबतच मनोरंजन आणि माहिती देण्याचंही काम करतात. ‘अनसंग वॉरिअर’ नावाची मालिका चालवून देशभरात जे योद्धे दुर्लक्षित राहिले किंवा आपल्या प्रादेशिक सीमांमध्येच मर्यादित राहिले त्यांना लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचं अजय देवगणने चित्रपटापूर्वीच सांगितलं होतं आणि त्याच उक्तीचं चित्रण चित्रपटातही आढळतं.

१७ व्या शतकातील महाराष्ट्र आणि त्यातही पुणे प्रांत दाखवत असताना दिग्दर्शकाने विशेष परिश्रम घेतले आहेत. अजय देवगण यांनी नरवीर तानाजी मालुसरेंच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला असून उदयभानच्या व्यक्तिरेखेत सैफ अली खान भलताच भाव खाऊन गेला आहे. सावित्रीची भूमिका साकारलेली काजोल आणि शिवाजी महाराजांची भूमिका केलेले शरद केळकर आपापल्या भूमिकेत चमकले आहेत. सूर्याजी मालुसरेंची भूमिकाही देवदत्त नागे यांनी फुलवली आहे.

ऐतिहासिक चित्रपटांमध्ये भव्यदिव्यता दाखवणं गरजेचं असलं तरी ते केवळ ऍनिमेटेड असून चालत नाही याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. व्ही.एफ.एक्स तंत्रज्ञानाचा चांगला वापर चित्रपटात केला आहे. चित्रपटांत दाखवलेल्या नद्या, गड-किल्ले यामध्ये हे तंत्रज्ञान उठावदर्शक दिसलं आहे.

चित्रपटाचा उत्तरार्ध हा पूर्णतः लढाईसंदर्भात असून लोकांना जागीच खिळवून ठेवणारा आहे. लढाईमध्ये आणि एकूणच चित्रपटात प्राण्यांचा वापर कमी केल्याचं जाणवून येतं. इतिहास माहित असला तरी तो रंगीत पडद्यावर पाहण्यात प्रेक्षकांना वेगळीच मजा वाटते आणि त्याचा अंदाज बांधूनच चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

मराठीमध्ये २ महिन्यांपूर्वी आलेल्या फत्तेशिकस्त चित्रपटामध्ये शाहिस्तेखानाची फजिती दाखवण्यात आली होती. मराठीसोबत हिंदीमधील चित्रपट दिग्दर्शकही ऐतिहासिक चित्रपटांकडे वळत असून यात शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास या सर्वांसाठीच मैलाचा दगड ठरत आहे.

चित्रपटाचं संगीत परिणामकारक असून माय भवानी, शंकरा ही गाणी प्रेक्षकांना विशेष भावली आहेत. वाघासारखं लढणं काय असतं हे या चित्रपटातून पहायला मिळालं, मराठ्यांच्या आक्रमक इतिहासाने अंगावर काटे आणले ही प्रेक्षकांची बोलकी प्रतिक्रिया इतर लोकांना चित्रपटांकडे ओढून न्यायला कारणीभूत ठरेल एवढं मात्र नक्की..

रेटिंग स्टार – ४/५

Leave a Comment