पुण्यात उपचाराअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू; अजितदादांनी दिले चौकशीचे आदेश

tanisha bhise pune
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तनिषा भिसे (Tanisha Bhise) या महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे आणि तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे याना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप केला जातोय. मोनाली भिसे यांच्या उपचारासाठी अडीच लाख भरल्यानंतरही पूर्ण 10 लाख रुपये भरत नाही, तोपर्यंत उपचार करणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर महिलेनं दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. परंतु तिचा मृत्यू झाला असं बोललं जातंय. या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आरोप- प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या महिलेला आपले प्राण गमवावे लागले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश देण्यात आले आहे”, असं अजित पवार यांनी म्हंटल. आरोग्य विभागाला तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने माध्यमांसमोर त्यांचे म्हणणे मांडले असले, तरी शासन या प्रकरणाचा सर्व संबंधित घटकांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करेल”, असंही अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.

तत्पूर्वी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटिस दिली जाणार आहे. महानगर पालिकेच्या आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांनी कारणे दाखवा नोटिस पाठवणार असल्याचे सांगितले आहे. झालेल्या प्रकाराबद्दल महानगरपालिका खुलासा मागणार आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आमदार अमित गोरखे यांचे भिसे म्हणून पीए आहेत. या भिसेंची ती पत्नी आहे. विचार करा. भाजपच्या कार्यकर्त्याची पत्नी. तिच्यासाठी फडणवीस यांच्या कार्यालयातून रुग्णालयात फोन गेला असं सांगितलं जातं. तरीही त्या महिलेवर ही वेळ आली. एका मातेचा करूण अंत झाला. फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर रुग्णालयावर कारवाई करा. भिसे कुटुंब ज्या डॉक्टरांची नावे घेत आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. नाहीतर तनिषा भिसे यांचा तुम्हाला शाप लागेल असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.