शिक्षक बनला भक्षक ! सर्वांना सुट्टी देत पीडितेला सोडवायला लावलं गणित अन्…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासून लहान मुलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्ध्यात अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका नराधम शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासत वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी देत पीडित मुलीसोबत घृणास्पद कृत्य केले. आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला गणित सोडवायला सांगून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. दीपक मंडलिक असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

आरोपी दीपक हा वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील धुमनखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला आहे. घटनेच्या दिवशी या आरोपी शिक्षकाने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी दिली होती. तर पीडित मुलीला एकटीला वर्गात बसायला सांगून गणित सोडवायला लावले होते. गणित सोडवत असताना आरोपी शिक्षकाने पीडितेजवळ जावून तिला दोन हजार रुपये दिले आणि तिच्याशी लैंगिक चाळे करण्यास सुरुवात केली.

घाबरलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने काही वेळ आरोपीचा त्रास सहन केला मात्र त्यानंतर या मुलीने हातातील सर्व पैसे आरोपीच्या तोंडावर फेकून वर्गातून पळ काढला. या आरोपी शिक्षकाच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी शिक्षकाविरोधात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Leave a Comment