हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिक्षक भरती संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. नुकतीच शिक्षक भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. ज्यात खासगी अनुदानित, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद शाळांचा समावेश असणार आहे. याबाबतची माहिती शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली आहे. (Teacher recruitment 2024 notification)
सुरज मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये पहिली ते बारावी पर्यंतच्या रिक्त शिक्षक पदांची भरती करण्यात येणार आहे. यावेळी 80 टक्के जागांसाठी ही शिक्षक भरती करण्यात येणार आहे. जून ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये शिक्षक पदांसाठीच्या बिंदूनामावली करण्यात आली होती. मात्र बिंदू नामावलीसंदर्भात विधीमंडळात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आल्यामुळे जिल्हा परिषदांच्या 10 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये 70 टक्के पदांसाठी शिक्षक भरती करण्यात येणार आहे.
कोणती पदे भरली जाणार?
मुख्य म्हणजे, शिक्षक भरती प्रक्रियाअंतर्गत ३४ जिल्हा परिषद १२ हजार ५२२ पदे, १८ महापालिका २ हजार ९५१ पदे, नगरपालिका ४७७, नगरपरिषदांतील १ हजार १२३, खासगी अनुदानित ५ हजार ७२८ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ पदे भरण्यात येतील. तर मुलाखत घेऊन ४ हजार ८७९ पदे भरली जातील. सर्व उमेदवारांना पसंती क्रम नमूद करण्याची सुविधा येत्या आठ फेब्रुवारीपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. सर्व इच्छुक उमेदवारांना ९ फेब्रुवारीपर्यंत पदनिहाय पसंतीक्रम नमूद करणे अनिवार्य असेल. पुढे या पदाभरतीसाठी उमेदवारांच्या प्राधान्य क्रमाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.