Sunday, May 28, 2023

मोदी ते शरद पवार टीम इंडियाच्या विजयाने हरखले; दिल्या अशाप्रकारे शुभेच्छा..

मुंबई । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने (Team India) रोमांचक विजय मिळवल्यानंतर राजकीय क्षेत्रातूनही टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही टीम इंडियाचे अभिमानदं केलं आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संघाचं कौतुक करताना म्हणाले, “ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला मिळालेल्या यशानं आम्हा सर्वांना खूप आनंद झाला आहे. संपूर्ण मालिकेत भारतीय संघाची उल्लेखनीय उर्जा आणि पॅशन दिसून आले. टीम इंडियाच्या खेळाडूंनी दाखवलेल्या दृढ निश्चय, धैय आणि निर्धाराचं खूप कौतुक आहे. संघाचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”, असं ट्विट मोदी यांनी केलं आहे.

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भारतीय संघाच्या विजयाचं कौतुक केलं आहे. पवार यांनी यावेळी मराठमोळ्या रहाणेचं विशेष कौतुक केलंय. “गाबा खेळपट्टीवर ३२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघाला थरारक कसोटी सामन्यात धूळ चारणाऱ्या भारतीय संघाचे मनपूर्वक अभिनंदन! अजिंक्य रहाणेच्या संघाने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास घडवला”, असं ट्विट पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, आस्ट्रेलिया विजयाने टीम इंडिया आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर जाऊन पोहोचली आहे. यापूर्वी न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर होता. तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. ब्रिस्बेन कसोटीतील विजयासह भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर धूळ चारण्याचा हा पराक्रम केला आहे.

ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरला तेव्हा हा सामना अनिर्णीत राहील, असा अनेकांचा होरा होता. मात्र, शुभमन गिल (९१) आणि चेतेश्वर पुजाराने (56) भारताच्या विजयाचा पाया रचायला सुरुवात केली. शुभमन गिल बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य राहणे झटपट 24 धावा केल्या. राहणे माघारी परतल्यानंतर मयांक अग्रवाल स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या समीप नेवून ठेवले. पंतने निर्णायक 89 धावांची नाबाद खेळी केली.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’