दहिवडी | वाळू, माती, मुरूम वाहतुकीसाठी माणचे तहसीलदार यांना सांगून सुरू करून देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राणंद (ता. माण) येथील कोतवाल व तहसीलदार यांच्या शासकीय वाहनावरील चालक कृष्णदेव ऊर्फ किसन दत्तात्रय गुजर (वय – 34) याच्यावर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून, गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी, तक्रारदार याचा वाळू, माती, मुरूम वाहतुकीचा व्यवसाय तहसीलदारांना सांगून सुरू करून देण्यासाठी कोतवाल किसन गुजर याने तक्रारदार याच्याकडे प्रत्येक महिन्याला 25 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार 28 डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांच्याकडे केली. तक्रारदार तक्रारीनुसार याने दिलेल्या विभागाच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणी कारवाईमध्ये किसन गुजर याने या तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांची मागणी करून चर्चेअंती 20 हजार रुपये मागणी करून वाळू, मुरूम, माती वाहतुकीचा व्यवसाय सुरू करण्यास सांगितले असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर किसन गुजर यांना तक्रारदार यांच्यावर शंका आल्याने त्याने लाच रक्कम स्वीकारली नाही.
किसन गुजर याच्याविरुद्ध दहिवडी पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव व सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलिस कर्मचारी अविनाश सागर, प्रीतम चौगुले, संजय संकपाळ, भास्कर भोरे, चालक बाळासाहेब पवार यांनी केली