दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ दिवशी मिळणार गुणपत्रिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | राज्य शालांत परीक्षा म्हणजे दहावीचा निकाल जाहीर होऊन पंधरा दिवस उलटले असले, तरी प्रत्यक्ष गुणपत्रिका मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना इतर प्रवेशासाठी अडचणी येत होत्या. परंतु, येत्या नऊ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना शाळामार्फत गुणपत्रिका देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. यंदा कोरोनामुळे शासनाने राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा रद्द केली होती. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार १६ जुलैला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता.

दरवर्षी निकाल जाहीर झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत शाळांमार्फत विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण केले जाते. परंतु, यंदा दहावीचा निकाल जाहीर होऊनही १५ दिवस उलटले, तरीही अद्याप गुणपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थी-पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, सध्या दहावीच्या गुणपत्रिकांचे छपाईचे काम वेगात होत असून, ते अंतिम टप्प्यात आहे. गुणपत्रिका विभागीय मंडळाकडून शाळांना वितरित करण्यासाठी सात आणि नऊ ऑगस्टपर्यंतचा कालावधी दिला आहे. तसेच प्रत्येक वितरण केंद्राला जोडलेल्या शाळांची संख्या लक्षात घेऊन जादा वितरण केंद्रे तयार करणे, वितरण केंद्रावर खिडक्यांची संख्या वाढविण्यात येतील. संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांना नऊ ऑगस्ट दुपारी तीन वाजल्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून गुणपत्रिकांचे वितरण करावे, अशी सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

गुणपत्रिका न मिळाल्याने खालील क्षेत्रात प्रवेशात अडसर –
– आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; परंतु पुढील प्रवेश प्रक्रिया दहावीची गुणपत्रिका मिळाल्यानंतर
– अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रवेश अर्ज भरताना मूळ गुणपत्रिकेअभावी अडथळा
– अकरावीसाठी ‘सीईटी’ नंतर होणार असली तरी त्याव्यतिरिक्त दहावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लांबली जाण्याची शक्यता

Leave a Comment