औरंगाबाद | मुल्यांकनाच्या आधारे जिल्ह्यातील दहावीचे 65 हजार 154 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील 426 शाळा महाविद्यालयात 72 हजार 860 जागा आहेत. त्यामुळे दहावी उत्तीर्ण सर्वांनाच अकरावीसाठी प्रवेश मिळणार आहे. शहरातील 116 महाविद्यालय यांसह सर्वच महाविद्यालयात ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असली तरी अकरावीची सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य असणार आहे. सध्या सीईटीसाठी अर्ज करणा-यांची वेबसाईट बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उजळणी अभ्यासावर भर द्यावा असे शिक्षक तज्ञांनी सांगितले आहे.
सीईटी नंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या असून सीईटी साठी अर्ज करण्याचे संकेत स्थळ सध्या बंद आहे. दहावीत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 14 हजार तर प्रथम श्रेणीत अकरा हजारापेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. त्यामुळे सीएटी शिवाय गुणांच्या आधारे अनुदानित शाखात प्रवेशासाठी चुरस वाढणार आहे. विकल्प असली तरी प्रतिसाद चांगला राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अकरावीची वैकल्पिक सामायिक प्रवेश परीक्षा 21 ऑगस्टला सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेच्या दरम्यान होणार आहे. या परीक्षेला इंग्रजी, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान सामाजिक शास्त्र या विषयावर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असणार आहेत. ऑफलाइन सीईटीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी मंडळाच्या http://cet.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 26 जुलैपर्यंत मुदत होती परंतु अद्याप वेबसाईट सुरु झाली नाही. मुदतवाढ मिळेल का असा प्रश्न प्रदीप पारिक यांच्यासह इतर पालकांना पडला आहे.