हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट (Massive Explosion) झाला आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांनी मदतकार्य सुरू करत कंपनीत अडकलेल्या इतर कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. तसेच, परिस्थीत नियंत्रणात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ठीक 11 वाजता कंपनीच्या परिसरात मोठा आवाज ऐकू आला. त्यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर आले. यानंतर घटनास्थळी जमाव जमू लागला. हा स्फोट आर के ब्रांच सेक्शनमध्ये झाला होता. जिथे कर्मचारी उपस्थीत होते. या स्फोटात तब्बल 8 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर जखमींना तातडीने भंडाऱ्यातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि बचावपथक कार्यरत आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन संपूर्ण परिसरही सील करण्यात आला आहे. तर, इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षास्थळी हलवण्यात आले आहे.
दरम्यान, या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु, साठवलेल्या स्फोटक पदार्थांच्या हाताळणी दरम्यान ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. महत्वाचे म्हणजे, या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच भंडारा जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तर, राज्य सरकाने या घटनेची गंभीर दखल घेत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.