शेंद्रा एमआयडीसी परिसरातील प्लास्टिक ग्रॅन्युअल्स युनिटला भीषण आग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शेंद्रा एमआयडीसीतील एका प्लास्टिक दाणे (ग्रॅन्युअल्स) बनविणार्‍या युनिटला काल रात्री आठच्या सुमारास अचानक आग लागली. शेंद्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या अर्धातासात ही आग संपूर्णतः आटोक्यात आणली. दरम्यान, तोपर्यंत कच्चा व तयार माल आणि मशिनरी जळुन सुमारे दहा ते बारा लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली.

शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील सेक्टर डी मधील प्लाॅट क्रमांक डी-105 मध्ये ‘ग्रेस इंडस्ट्रीज’ नावाचे एक युनीट आहे. या युनिटमध्ये प्लास्टिकपासुन प्लास्टिक दाण्यांचे (ग्रॅन्युअल्स) उत्पादन केले जाते. शनिवारी रात्री आठच्या सुमारास या कंपनी आवारातुन धुर येत असल्याचे काहींना निदर्शनास आले. काही क्षणातच या धुराची जागा आगीने घेतली. तेव्हा शेंद्रा अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वप्रथम या युनिटच्या बाजुने असणार्‍या कंपन्यांना धोका पोहोचू नये म्हणून ग्रेस इंडस्टीजच्या बाहेरील चारही बाजुंनी पाण्याचा मारा केला. रात्रीची वेळ असल्याने आग दुरवरून स्पष्ट दिसत होती. आत प्लास्टिक असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महावितरण कंपनीने या भागाचा वीजपुरवठा खंडित केला. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. यात अग्निशमन दलाच्या जवानांना या गर्दीमुळे कित्येकदा अडथळाही आला. अखेर अर्धातासानंतर दोन बंबांच्या मदतीने ही आग आटोक्यात आली. अचानकच्या या धक्क्याने युनिट संचालक स्वतः ला सावरू न शकल्याने आगीचे प्राथमिक कारण व इतर अधिक माहिती मिळू शकली नाही. तथापि, कंपनीतील कच्चा व तयार माल आणि मशिनरी मिळुन अंदाजे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी शेंद्रा अग्निशमन दलाचे उपअग्निशमन अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, प्रशांत कातकडे, संजय जाधव, रवि नवगिरे, विशाल पाटील, सुनील पाटील आदींनी परिश्रम घेतले.

 

Leave a Comment