औरंगाबाद :शहरात अनेक ठिकाणी नशेखोरीचे प्रमाण वाढले आहे. स्थानिकांना मानसिक त्रास, महिलांची छेडछाड, वाहनांची तोडफोड आदी घटना घडत आहे. मुकुंदवाडीत सर्वाधिक अवैध दारू विक्री सुरू आहे. दारु या विक्रेत्यांच्या दहशतीमुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत गेल्या सहा दिवसात या भागातील त्रस्त महिलांनी दोन वेळा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने संजयनगर, मुकुंदनगर, राज नगरात अवैध दारू विक्रेते खुलेआम वापरत आहेत.
3 जून रोजी मुकुंदवाडीतील संघर्षनगरात अवैध दारू विक्रेत्याला विरोध केल्याने वाद निर्माण झाला होता. यावेळी विनंती करणाऱ्या काही स्थानिकांनाच मारहाण झाल्याची घटना घडली. यानंतर माजी नगरसेवक मनोज गांगवे, स्थानिक कविता सातपुते, लता जगताप, आशा शेळके, अरुणा जाधव यांच्यासह 20 ते 25 महिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी लता जगताप यांनी अवैध दारू विक्रीसंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली. शिवाय स्थानिक दारू विक्रेते पोलिसांचे नाव सांगून मारहाण करत असल्याचे ही सांगितले.
तक्रार करूनही दारू विक्री सुरूच
गेल्या महिन्यात वाहनांची तोडफोड झाल्याने भीतीचे वातावरण आहे. 3 जून रोजी च्या तक्रारीनंतरही परिसरात ठिकठिकाणी अवैध दारू विक्री सुरूच असल्याचे स्थानिक सांगतात. या घटनेनंतर मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुकुंदनगर, राज नगर मधील महिलांनी ठाण्यात मोर्चा नेला. मुकुंद नगरात दारू विक्रेत्यांवर कोणाचाही धाक नाही त्यामुळे ते रहिवाशांना धमक्या देतात. यात महिला विक्रेत्यांचा समावेश असलेले माजी नगरसेवक मोहनलाल यांनी सांगितले.