हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला असून , हल्ला पर्यटकांच्या एका ग्रुपवर करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे एका पर्यटकांचा मृत्यू झाला आहे व सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन पर्यटकांसह तीन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये काही घोड्यांनाही गोळ्या लागल्या आहेत.
दहशतवाद्यांनी अचानक सुरू केला गोळीबार –
दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केल्यानंतर एक महिला पर्यटकाने काश्मीर पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. तिच्या पतीच्या डोक्यात गोळी लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे.
#WATCH | Firing incident reported in Pahalgam, J&K; Police and Security Forces present on the spot
Details awaited. pic.twitter.com/jlDZ1oubnB
— ANI (@ANI) April 22, 2025
हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. विशेष म्हणजे, हा हल्ला अशा भागात झाला आहे जिथे मागील काही काळात दहशतवादी हालचाली जवळपास नाहीशा झाल्या होत्या. त्यामुळे या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा अमरनाथ यात्रेची तयारी सुरू आहे. यात्रेचा बेस कॅम्प पहलगाममध्येच आहे. मार्च महिन्यात झालेल्या बर्फवृष्टीनंतर पहलगाममध्ये पर्यटकांची वर्दळ वाढली होती. पर्यटन हंगाम सुरू असतानाच घडलेली ही घटना अत्यंत चिंताजनक मानली जात आहे.
स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण –
या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, पुढील संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात येत आहे.