हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. मात्र या अधिवेशनापूर्वीच राजकीय घटनांचा जबरदस्त योगायोग पाहिला मिळाला. आज सर्वात अगोदर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेट घडली. त्यानंतर योगायोगाने विधानसभेच्या लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात देखील भेट झाली. या लिफ्टमध्ये प्रवीण दरेकर आणि मिलिंद नार्वेकर सुद्धा होते. याचवेळी लिस्टमध्ये असताना हास्यविनोदीही झाला. या लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं? हे प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.
माध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, “राजकारणात आपण राजकीय शत्रू असू, पण सदासर्वकाळ शत्रू नसतो. आज विधानसभेच्या सभागृहाकडे जाताना मी लिफ्टमध्ये आत शिरत असताना देवेंद्र आणि उद्धवजी आले, त्यावेळी मिलिंद नार्वेकर हेही सोबत होते. पुढे लिफ्ट सुरू झाल्यानंतर कोणीतरी बोललं, ‘आपण दोघं एकत्र आहात, बरं वाटतं’. यावर ठाकरे यांनी माझ्याकडे बोट दाखवून फडणवीस यांना सांगितले की, ‘याला पहिले बाहेर काढा'” त्यानंतर मी (प्रवीण दरेकर) म्हणालो की, “‘तुमचं अजून समाधान झालं नाही का मी शिवसेनेतून बाहेर जाऊन. माझी बाहेर जायची तयारी आहे. तुम्ही होता का एकत्र? बोलता तसं करा’. त्यानंतर लिफ्टमध्ये हास्यविनोद झाला. या घटनेनंतर आम्ही लिफ्टमधून बाहेर पडलो, उद्धव ठाकरे विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. त्यांची मानसिकता विरोधी पक्षात राहायची आहे, ते सत्तेच्या दिशेने आले नाहीत. आम्ही लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर आमचे वेगळे मार्ग दिसून आले आहेत”
दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये देखील भेट झाली. या भेटीवेळी ठाकरे चंद्रकांत पाटलांना म्हणाले की, बसा गप्पा मारूयात. झाले असे की, “ठाकरे आणि फडणवीस यांची भेट होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात चंद्रकांत पाटील आले होते. तेव्हा दालनात ठाकरे आणि अनिल परब उपस्थित होते. तेव्हाच ठाकरे चंद्रकांत पाटील यांना म्हणाले की, बसा गप्पा मारूयात. पण चंद्रकांत पाटलांनी कामाचे कारण देत काढता पाय घेतला.”