थाळीनाद : कराडला प्रहारचे खत दरवाढ व डाळ आयात विरोधात आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

केंद्र सरकारने केलेल्या खत दरवाढ व डाळ आयात धोरणा विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कराडला थाळी नाद आंदोलन करण्यात आले. तसेच खत दरवाढ व डाळ आयात मागे न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ऐन हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारने खत दरवाढ कल्याने प्रहारचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चू कडू यांनी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार गुरुवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजितराव बानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील दत्त चौकात थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बापू घराळ, प्रहारचे मनोज माळी, ऋतुराज बानगुडे, डॅनी आराॅंज, मनोज माळी मसुर आदींची उपस्थिती होती. कोरोनाच्या अनुषंगाने लागू असलेल्या लाॅकडाऊन मुळे केवळ पाच कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. केंद्र सरकारने शेतकरी उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचा अनिल बापू घराळ यांनी निषेध केला.

यावेळी मनोज माळी म्हणाले की, देशाच्या आवश्यकतेपेक्षा दोन लाख टन डाळ जादा शिल्लक असतानाही केंद्र सरकारने डाळ आयात करण्याचा घाट घातला आहे. यामुळे देशातील शेतकरी अडचणीत येणार आहे. तर गेली वर्षभरापासून सुरू असलेल्या लाॅकडाऊन मुळे शेतकरी अडचणीत आला आहे अशावेळी हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारने खत दरवाढ कल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत येत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने खत दरवाढ मागे घ्यावी, तसेच डाळ आयात निर्णय ही मागे घ्यावा अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

Leave a Comment