धक्कादायक ! पूर्वी मारहाण केल्याच्या रागातून चुलत भावाची हत्या

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पूर्वी मारहाण केल्याच्या रागातून चुलत भावाने चुलत भावाची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयाने त्याला ४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीचे नाव अंकुश चव्हाण आहे. तो भिवंडीतील अंजूरफाटा येथील शिवाजीनगर परिसरात राहतो तर आरोपीचा चुलत भाऊ मृत सुधीर चव्हाणदेखील याच भागात राहतो.

काही दिवसांपूर्वी सुधीरने अंकुशला मारहाण केली होती. याचा अंकुशला खूप राग आला होता. याच रागातून अंकुश सुधीरला रिक्षातून घेऊन भिवंडीतील डोंगराळी गावाजवळील जंगल परिसरात गेला. तिकडे दारू पाजल्यानंतर त्याने सुधीरच्या डोक्यात दगड फोडण्यासाठी वापरण्यात येणारी हातोडी मारली. यामध्ये जखमी झालेल्या सुधीरला आधी ठाण्यातील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि नंतर मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी अंकुशविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. परंतु सोमवारी रात्री अडीच वाजता उपचारादरम्यान सुधीरचा मृत्यू झाला. त्यामुळे आता या गुन्ह्यात हत्येचे कलम वाढवण्यात आले असून पोलिसांनी रिक्षाचालक असलेला अंकुशला अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणपराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्याकडून करण्यात येत आहे.