हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी आघाडी करून राज्यात प्रथमच महाविकास आघाडीची स्थापना होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सत्ताधारी व विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या आघाडीचे एक शिल्पकार असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारच्या भवितव्याबद्दल पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या सामना अग्रलेखात त्यांनी सत्ता वाटपाच्या बैठकीतला एक प्रसंग मात्र उघड केला आहे.
सामना’तील एका लेखातून त्यांनी महाविकास आघाडीच्या सत्तावाटपाच्या वेळी घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. ते म्हणतात, ‘असे एखादे सरकार येईल असा विश्वास काँग्रेसला आणि शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांनाही नव्हता. शरद पवार व माझ्यात ३५ दिवस सुरू असलेल्या गाठीभेटी हा निव्वळ टाईमपास आहे असा अपप्रचार सुरू झाला. आमच्याकडं १७० आमदारांचे पाठबळ आहे, या माझ्या दाव्याची खिल्ली उडवण्यात आली. तोपर्यंत सरकार स्थापनेसंदर्भात काँगेसचा स्पष्ट होकार आला नव्हता, पण अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते. नेहरू सेंटरमधल्या २२ नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली.
विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे व अन्य काही नेत्यांनी घेतली. तिथे खरगे व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी व प्रफुल पटेल धावत गेलो. त्याच बैठकीत सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे पवार यांनीच सुचवले, पण खरगे, पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला.’ असे संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडी व फडणवीस-अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत करण्यात आलेले अनेक दावे राऊत यांनी खोडून काढले आहेत. निवडणुकांचे निकाल ते शपथविधी हा ३७ दिवसांचा रोमांचक प्रवास होता. या सर्व दिवसांतील बहुतेक सर्व घडामोडींचा मी साक्षीदार आहे. महाराष्ट्राबरोबर यात दिल्लीच्याही घडामोडी आहेत. सरकार स्थापनेच्या नाट्याची खरी पटकथा अद्याप पडद्यामागेच आहे व राहील,’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’