‘कृष्णा’च्या साथीने १०४ वर्षांच्या वृद्ध गृहस्थाची कोरोनावर यशस्वी मात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

कोरोनाच्या या महाभयानक विषाणुपुढे टिकणं हे कुणाचंही काम नाही. अनेक जणांना कोरोनामुळे जीवही गमवावा लागला आहे. तर अनेकांनी आपल्या हिमतीवर यशस्वीपणे उपचार घेत कोरोनावर मातही केली आहे. कराड तालुक्यातील इंदोलीत राहणाऱ्या तब्बल १०४ वर्षीय आजोबांनी यशस्वीपणे उपचार घेत कोरोनावर यश मिळवलं आहे. कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या कोविड वॉर्डमध्ये गेल्या १० दिवसांपासून उपचार घेत असलेले कराड तालुक्यातील इंदोली येथील १०४ वर्षे वयाचे वृद्ध गृहस्थ रघुनाथ जाधव यांनी आज कोरोनावर यशस्वी मात केली.

पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी कृष्णा हॉस्पिटल वरदान ठरले आहे. गेल्या १० दिवसांपूर्वी इंदोली येथील रघुनाथ जाधव (वय १०४) यांची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आल्याने ते पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलच्या कोविड वॉर्डमध्ये दाखल झाले होते. त्यांचे वय खूपच जास्त असल्याने त्यांच्यावर उपचार करण्याचे मोठे आव्हान कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टरांसमोर होते. पण डॉक्टरांनी हे आव्हान यशस्वीपणे स्वीकारत योग्य उपचाराने या रूग्णास कोरोनामुक्त केले. कोरोनामुक्त झालेले श्री. जाधव यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान आजअखेर कृष्णा हॉस्पिटलमधून ४९६५ कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

यावेळी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील उपस्थित होते. कोरोनावर यशस्वीपणे मत करायची असेल तर योग्य उपचार व त्यासाठी मनात प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते, हे या आजोबानी दाखवून दिले आहे.

Leave a Comment