विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन अकरा दिवसांनी स्थगित

औरंगाबाद – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना व सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत शासन सकारात्मक असून, सदरील प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहेत. असे आश्वासन दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यभरातील सर्व विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काल अकराव्या दिवशी बेमुदत संप स्थगित केला आहे. कर्मचारी आजपासून नियमितपणे कामावर रुजू होणार आहेत.

महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने 18 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला होता. काल उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कृती समितीच्या अध्यक्षांना शासनासोबत झालेल्या बैठकीतील सकारात्मक निर्णय कळवला. त्यामुळे कृती समितीने बेमुदत आंदोलन स्थगित करण्याची सूचना विद्यापीठ कर्मचारी सेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी काल अकराव्या दिवशी आंदोलन स्थगित केले.

या आंदोलनात विद्यापीठातील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे 18 डिसेंबर पासून विद्यापीठातील सर्व कामकाज विस्कळीत झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यापीठ कर्मचारी सेवक संघाचे अध्यक्ष पर्वत कासुरे, कर्मचारी नेते डॉ. कैलास पाथ्रीकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले होते.