सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
कोरेगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र चंदन-वंदनला जोडणारा रस्त्याची डागडुजी अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर करण्यात आली. परंतु या रस्त्यावरील अरबवडी ते इब्राहिमपूर या दोन किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील रस्त्याची एका महिन्याच्या आतच दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याचा ग्रामसस्थाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कोरेगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र चंदन-वंदनला जोडणारा रस्ता बऱ्याच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर करण्यात आला. मात्र, रस्ता झाल्यानंतर लगेच एका महिन्याच्या आतच जागोजागी खड्यांचे साम्राज्य पसरू लागले आहे. लोकप्रतिनिधी व ठेकेदारांच्या गलथान कारभारामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. अक्षरशः या रस्त्यावरील डांबर चक्क पायाने देखील निघत असल्याने परिसरातील ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
निकृष्ठदर्जाच्या पद्धतीने केल्या गेलेल्या रस्त्याच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर सुमारे दोन किलोमीटरच्या या रस्त्याच्या कामासाठी दहा वर्षांपासून निधी पडून होता. दहा वर्षांनंतर या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून करण्यात आलेले आहे. मात्र, काही दिवसातच रस्त्याची दुरावस्था झाली आहे. जर ठेकेदाराने रस्त्याची पुन्हा डागडुजी केली नाही तर येत्या काही दिवसांतच या ठेकेदारांच्या विरोधात जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा परिसरातील ग्रामसंस्थानी दिला आहे.