शिर्डी : देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थानाचा वाद चांगलाच पेटला आहे. विरोधक देखील या प्रश्नावरून सरकारला लक्ष्य करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या बैठक घेऊन या वादावर तोडगा काढणार आहेत. तत्पूर्वी या सरकारमधील जबाबदार मंत्री छगन भुजबळ यांनी या वादासंदर्भात भाष्य केले आहे. साईबाबांच्या जन्मस्थळावरून सुरु असलेला वाद साईबाबांनाच आवडणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचे कोणीही राजकारण करू नये, असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला आहे.
परभणीतील पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. त्याला आव्हान देत शिर्डीकरांनी आजपासून बेमुदत शिर्डी बंद पुकारला आहे. या बंददरम्यानच आज छगन भुजबळ यांनी शिर्डीत जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी शिर्डी व पाथरीकरांना ‘सबुरी’ राखण्याचे आवाहन केले व हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा सल्ला दिला.
शिर्डी बंद करून प्रश्न सुटणार नाही
देशात आधीच मोठे वाद चिघळलेले असताना साईबाबांचे जन्मस्थळ शिर्डी की पाथरी हा वाद का उकरून काढला जात आहे?, असा सवाल करतानाच शिर्डी बंद ठेवून हा प्रश्न सुटणार नाही तर शांततेच्या मार्गाने चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.