कराड | कराड- ढेबावाडी मार्गावर शनिवारी सकाळी अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता. सदरील मृतदेह हा दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिद्रुकवाडी नथुराम पाटील (गुढे, ता. पाटण) येथील युवकाचा असल्याचे तपासात समोर आले आहे. नथुराम मोहन पाटील (वय- 34) असे मृत युवकाचे नाव असून, त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत पोलिसांची माहिती अशी, शिद्रुकवाडी (गुढे) येथील नथुराम पाटील मुंबईस कामाला होते. मात्र, अलीकडे काही दिवसांपासून ते गावीच राहात होते. दहा दिवसांपूर्वी कोणाला काही न सांगता ते घरातून निघून गेले. कुटुंबीय, नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचा विविध ठिकाणी शोध घेऊनही न सापडल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रार अखेर येथील पोलिस ठाण्यात देण्यात आली.
शनिवारी सकाळी कराड-ढेबेवाडी मार्गावरील वांग नदीपात्रातील नव्या पुलानजीकच असलेल्या जुन्या कमी उंचीच्या व वापरात नसलेल्या पुलाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना नागरिकांना आढळून आला. याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेह पाण्याबाहेर काढून ओळख पटविल्यावर तो नथुराम पाटील यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी शिद्रुकवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. बी. राक्षे तपास करत आहेत