व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराड येथे युवकाचा मृतदेह बांधकाम विभागाच्या कार्यालयात, ग्रामस्थ आक्रमक

कराड | तांबवे ते उत्तर तांबवे (ता.कराड) गावच्या दरम्यान रस्त्यावरील चरीत दुचाकी पडुन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज मृत्यु झाला. दादासाहेब भिमराव यादव (वय- 38,रा. आरेवाडी, ता. कराड) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या विशेष कार्य विभागाच्या मलकापुरच्या शास्त्रीनगर कार्यालयासमोर संबंधित युवकाचा मृतदेह नेवुन जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तांबवे फाटा ते उत्तर तांबवे रस्ता उकरून कोणीतरी चर काढलेली होती. त्या चरीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले होते. त्या चरीत आरेवाडीतील दादासाहेब यादव हा तरुण दुचाकीसह पडुन गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्याचा आज मृत्यु झाला. त्यामुळे नातेवाईकांसह ग्रामस्थ आक्रमक झाले होते. ग्रामस्थांनी संबंधित युवकाचा मृतदेह थेट मलकापुच्या शास्त्रीनगर येथील बांधकाम विभागाच्या विशेष कार्य विभागाच्या येथील कार्यालयासमोर नेला. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान ग्रामस्थांशी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यांनी संबंधितावर कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी युवकाचा मृतदेह ताब्यात घेवुन आरेवाडी येथुन त्यावर अंत्यसंस्कार केले.