धक्कादायक ! दुसऱ्या मुलासोबत बोलल्यामुळे प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला विहिरीत ढकलले

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – वर्धा जिल्ह्यातील आर्वी या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत बोलताना पाहिले आणि त्याचा राग अनावर झाला. याच रागातून त्याने आपल्या प्रेयसीला विहिरीत ढकलून तिची हत्या केली. हत्या झाल्यानंतर पाच दिवसांनंतर हि घटना उघडकीस आली. यानंतर पोलिसांनी या आरोपी तरुणाला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अजय आत्राम असे आहे. अजय याचे आर्वी शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. या दरम्यान अजयने अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी त्याची प्रेयसी एका मुलासोबत बोलत होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यामुळे त्यांच्यात कडाक्याचे मोठे भांडण झाले. आणि याच रागातून अजयने आपल्या प्रेयसीला जवळच असलेल्या एका विहिरीत ढकलून दिले. यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.

चार ते पाच दिवसानंतर मृतदेह कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली. त्यामुळे स्थानिक लोकांनी विहिरीत पाहिले असता त्यांना मुलीचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. या अल्पवयीन मुलीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मारेकरी प्रियकर अजय आत्रामला अटक केली आहे. या प्रकरणी अजयविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.