औरंगाबाद । शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते दुपारपासून विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे.
अरबी समुद्रात अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढत असून चक्रीवादळाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. याबरोबरच राज्यासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला होता.
त्यानुसार आज औरंगाबाद शहर व जिल्हात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह पाऊस पडत आहे. आज पावसासह वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रतितास आहे. सध्या शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. औरंगाबाद शहरासह जवळपास सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने रविवारी हजेरी लावली आहे.
मराठवाड्यात आणखी दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. मागील काही दिवसांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते मोठ्या प्रमाणावर उन्हाची तीव्रता वाढली होती त्यामुळे उष्णता ही चांगलीच वाढली आहे. आज होत असलेल्या पावसामुळे काही अंशी उष्णता कमी झाली आहे. दरम्यान 31 मे रोजी मोसमी पाऊस केरळ येथे दाखल होणार असून त्यानंतर आठ दिवसांनी महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.