शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 8.63 टक्क्यांवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मुंबई, पुणे पाठोपाठ आता औरंगाबाद शहरातही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. रुग्णांचा आकडा शंभरच्या पुढे जात असल्याने शहराचा पॉझिटिव्हीटी रेट हा 8.63 टक्क्यांवर पोचला असून, ही बाब शहरासाठी चिंताजनक मानली जात आहे.राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर करत निर्बंध आणखी कडक केले आहे.

दिवाळी सण, नाताळ सण, थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त औरंगाबादेत बाजारपेठा, हॉटेल, रेस्टॉरंटवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. या गर्दीचे पडसाद आता औरंगाबाद शहरात दिसून येत आहे. जानेवारीचा महिना लागल्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. मागील चार दिवसांपासून शहरात शंभरपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नव्याने भर पडत आहे. ही संख्या अशीच वाढत राहिल्यास अवघ्या दोनच दिवसांत शहरातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची हजाराच्या घरात जाण्याची भीती पालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे. रविवारी दिवसभरात 2168 आरटीपीसीआर व अ‍ॅन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. रविवारी दिवसभरात केलेल्या अ‍ॅन्टिजेन चाचण्यांचे अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

काल दिवसभरात 183 कोरोनाबाधीत आढळल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 664 वर पोचली आहे. यातील सर्वाधिक 108 रूग्ण पालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड रूग्णालयात दाखल आहेत. तर, घाटीमध्ये 28 जण उपचार घेत आहेत. खासगी रूग्णालयांत 75 बाधीतांवर उपचार सुरू आहेत.

Leave a Comment