चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय गडचिरोलीतील जनतेच्या हिताविरुद्ध, 250 गावांनी केला निषेध

गडचिरोली |  महाराष्ट्र शासनाने चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. हा निर्णय जनतेच्या हिताविरुद्ध असून दारू विक्रेत्यांच्या फायद्याचा आहे, असे मत व्यक्त करीत, गडचिरोली जिल्ह्यातील गावांनी निषेध नोंदवित हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.

दारूमुळे अन्याय झालेल्या लक्षवधी महिलांची व्यथा तत्कालीन सरकारने लक्षात घेऊन २०१५ मध्ये चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू केली. मात्र यावर पाणी फेरण्यासाठी गेल्या बरेच दिवसांपासून काही नेत्यांनी धावपळ सुरु केली होती. शेवटी २७ मे रोजी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णयाचा विरोध चंद्रपूर जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यात देखील होताना दिसत आहे.

चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेत महसुलासाठी गरिबांच्या आयुष्याशी सरकार खेळ खेळत आहे. कौटुंबिक प्रश्न दारूमुळे निर्माण झाले आहेत. दारूमुळे वर्षाला कितीतरी अपघात होतात. चोरी, गुन्ह्याला प्रोत्साहनाचे मूळ कारण दारू आहे. मग अशा दारूसारख्या पदार्थाला सरकारने प्रोत्साहन का द्यावे, असा सवाल गडचिरोली जिल्ह्यातील विविध गावांनी उपस्थित करीत चंद्रपूरच्या दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यास गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीला सुद्धा धक्का लागण्याची शक्यता आहे. दारू सुरु असलेल्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी वाढणार, गडचिरोलीतील व्यसनाधीनतेचेही प्रमाण वाढणार. यासाठी गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू येणार नाही यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी, अशीही मागणी गडचिरोली जिल्ह्यातील 250 गावांनी केली आहे. आणि रोज यात नवीन गाव सामील होत आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like