औरंगाबाद | नवीन शैक्षणिक धोरणात उच्च व तंत्रशिक्षण तसेच वैद्यकीय व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण मातृभाषेतून देण्याचा निर्णय देशाच्या प्रगतीसाठी क्रांतीकारक ठरेल, असा विश्वास ‘एआयसीटीई‘चे अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केला. देशात पाच प्रादेशिक भाषेत 14 तंत्रशिचण संस्थामध्ये यंदापासून हा प्रयोग राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी घोषित केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच दीक्षांत समारंभ ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला. मा.कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी हा कार्यक्रम झाला. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे हे यंदाचे दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.धनश्री महाजन, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील आदींची उपस्थिती होती. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे, प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, डॉ.हरिदास विधाते, डॉ.फुलचंद सलामपुरे, डॉ.राजेश करपे, डॉ.सचिन देशमुख, डॉ.राहुल म्हस्के, डॉ.विलास खंदारे, डॉ.प्रतिभा अहिरे, राजेंद्र मडके आदींची उपस्थिती होती.
यावेळी डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थी केंद्रीत असून देशाच्या शैक्षणिक पाया बळकट करणारे आहे. पुर्वीच्या काळापासून भारतात प्रादेशिक व स्थानिक भाषेतून प्राथमिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. आता नव्या धोरणात ज्ञानव्यवस्था, आंतर विद्याशाखीय दृष्टीकोन व नवोन्मेष आदींनी प्राधान्य देण्यात आले आहे. या धोरणामुळे देशाच्या शेक्षणिक विकासात अमुलाग्र बदल होऊन उद्योजकीय कौशल्ये विकसीत होणार आहेत. समाज माध्यमे व माहिती तंत्रज्ञानाच्या काळात विद्याथ्र्यांनी टेक्नोसॅव्ही होऊन स्वत: सोबतच समाज व देशाचा विकास साधावा, असे आवाहनही डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी केले. मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू व बंगाली या पाच भाषांमधून १४ तंत्रशिक्षण संस्थेत व्यावसायिक शिक्षण यंदापासून सुरु होत असल्याचे यावेळी डॉ.सहस्त्रबुध्दे यांनी घोषित केले.
यावेळी संशोधकांच्या पीएच.डीचे वितरण प्रत्यक्ष न घेता ऑनलाईन पध्दतीने नाववाचन करण्यात आले. या समारंभात 422 संशोधकांना पीएचडी प्रदान करण्यात आली. यामध्ये कला व सामाजिकशास्त्रे -174, विज्ञान व तंत्रज्ञान -127, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र – 58 तसेच आंतरविद्या शाखेच्या – 63 संशोधकांचा समावेश आहे. ‘राजभवना‘च्या प्रोटोकॉल नूसार सदर सोहळा अत्यंत शिस्तबध्द व प्रोपेâशन पध्दतीने कार्यक्रम घेण्यता आला. या कार्यक्रमात एकुण 81 हजार 736 पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात आले. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान – 38 हजार 541, मानव्यविद्या – 20 हजार 392, वाणिज्य शास्त्र – 17 हजार 593, आंतर विद्या शाखेच्या 4 हजार 210 जणांचा समावेश आहे. प्रारंभी मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी विद्यापीठाचा प्रगतीचा अहवाल सादर केला. सोहळयाच्या नियोजनासाठी विविध 14 समित्यांची स्थापना करण्यात आली होती. सोहळयाचे संकेतस्थळ व फेसबुक पेजवरुन प्रक्षेपण करण्यात आले.