औरंगाबाद : दारु पिण्यासाठी 40 रुपये दिले नाही म्हणून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना 7 दिवसांनंतर आज उघडकीस आली आहे. या आरोपीला 7 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही घटना बालानगर येथे घडली.
मीराबाई ढोकळे, वय 35 (रा बालानगर) असे मृताचे नाव असून कैलास ढोकळे, वय 39 असे आरोपीचे नाव आहे. 28 जुन रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास आरोपीने पत्नीला दारु पिण्यासाठी 40 रुपये मागितले परंतु पत्नीने नकार दिला. संतापलेल्या आरोपीने पत्नीला शिवीगाळ करून तिचा गळा दाबून खून केला. आईचा खून मी केला आहे हे कोणाला सांगितले तर तुम्हाला पण मारुन टाकेल, अशी धमकी आरोपीने मुलांना दिल्यामुळे ते शांत बसले. माझी पत्नी आजारी होती. अशी खोटी बातमी गावात पसरून दुसर्या दिवशी गावातील लोकांच्या समक्ष अंत्यसंस्कार केले.
आपल्या आईचा खून आपल्या वडिलांनी डोळ्यासमोर केला तरीपण आपण शांत बसलो पण आता काय करावे हे मुलांना कळत नव्हते. अखेर सहा दिवसानंतर विहामांडवा येथे जाऊन आजी इंदुबाई धोंडिराम गुंजाळ (55) यांना सांगितले. इंदुबाई यांनी 5 जुलै रोजी पैठण एम आयसीसी पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीविषयी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी दोन तासातच आरोपीला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे, यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना पाटील, बीट जमादार जावळे, संपत दळवी, विजय मोरे, शरद पवार करीत आहे.