सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
इस्लामपूर नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडणाऱ्या कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. इस्लामपूर नगरपरिषदेच्या कापुसखेड नाका स्मशानभूमीत एका बाजूला मृतदेह जळतोय आणि दुसऱ्या बाजूला कुत्रे अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडतोय असे विदारक चित्र प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आणणारे आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित व्यक्ती व्हिडिओ करताना शिराळा तालुक्यातील नागरिकाने अशा व्यवस्थेला जबाबदार कोण जिल्ह्याचे पालकमंत्री, कलेक्टर की नगरपालिकेचे प्रशासन असा जाब विचारत आपली व्यथा मांडली आहे.
शिराळ्यातील कोरोना बाधित रुग्ण व्हेंटीलेटर न मिळाल्याने मृत झाला. शिराळा तालुक्यात व्हेंटिलेटरची व्यवस्था नसल्याने नातेवाईकांनी संबंधित रुग्णाला इस्लामपूर शहरातील एका कोविड सेंटर मध्ये ३४ हजार रुपये भरून दाखल केले. मात्र, रुग्ण बरा होऊन घरी घेऊन जाण्याऐवजी मृतदेहच अंत्यसंस्कारासाठी नगरपालिकेचा स्मशानभूमीत गेला. संबंधित नातेवाईक कापूसखेड नाका परिसरातील स्मशानभूमीत गेल्यावर तेथील परिस्थिती पाहून हतबल झाले. त्या कोरोना बाधित रुग्णावर पालिका कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. मृतदेह हा अर्धवट जळलेला होता. पालिका कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचवेळी दुसरीकडे एक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आला होता. त्यावेळी तिथे त्या मृताचे नातेवाईक उपस्थित होते. त्यावेळी एक भटके कुत्री त्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडत होते. हे मन हेलावणारे विदारक चित्र पाहून एका व्यक्तीने व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल करून प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आणला आहे. संबंधित व्हिडिओ द्वारे राज्यकर्त्यांना जाब विचारला आहे. इस्लामपूर नगरपालिकेची गॅस दाहिनी आहे. परंतु शहर व परिसरातील मृत्यूचा आकडा वाढल्याने गॅस दाहीणीला काही वेळा वेटिंगसाठी थांबावे लागते. यामुळे मृतदेहांचे अंत्यसंस्कार लाकडाच्या जळणाने केले जात आहेत. परिणामी अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे कुत्रे लचके तोडत आहेत. जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने मृत्यूंची संख्या लक्षणीय वाढली आहे. जिवंत असतानाही नरकयातना भोगाव्या लागत आहेत आणि मृत्यूनंतरही अशाप्रकारे अवहेलना सुरी सुरू असल्याचे चित्र आहे. मृत्यूनंतरही होणारी अवहेलना पाहून कोरोनाची भीषणता स्पष्ट होत असली तरी प्रशासनाच्या कारभाराच्या पुरत्या चिंधड्या उडाल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. यातून प्रशासन नेमका बोध घेणार का ? हा प्रश्न आता समोर येत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’