चालकाचा ताबा सुटल्याने वीस फूट खोल ओढ्यात कोसळली बस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । शिराळा तालुक्यातील मेणी येथे चालकाचा ताबा सुटल्याने खासगी बस पुलाच्या कठडा आणि लोखंडी पाईप तोडून वीस फूट खोल ओढ्यात कोसळली. यात नऊ जण जखमी झाले. अपघातात बसचे आठ लाखांचे नुकसान झाले. बस गोव्याहून राजस्थानकडे जाताना पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून कोकरुड पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. या घटनेबाबत ताराचंद रामविलास साहू याने फिर्याद दिली आहे.

ताराचंद रामविलास साहू हा आपल्या सहकाऱ्यांसह गोव्यात एक लग्न समारंभास खासगी बसने गेला होता. तेथून परत बुधवारी रात्री आंबाघाट, मलकापूरमार्गे कराडकडे जात होता. शिराळा तालुक्यातील मेणी येथे आल्यावर चालक राजुसिंग राजपूत याला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला. यामुळे ओढ्यावरील पुलाचा कठडा आणि पाईपला बसची जोरदार धडक बसली. यांनतर बस पलटी होऊन थेट वीस फूट खोल ओढ्यातील पाण्यात कोसळली. यामध्ये ताराचंद साहू, राजुसिंग राजपूत, चंद्रप्रकाश माळी, पिंटू गुज्जर, अशोक प्रजापत, जसराज जाट, गोपाल, कान्हा जाट, राजेंद्र सिंह हे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच बाजार समिती संचालक दिनकर दिंडे यांनी अमीर मोकाशी, रमजान मोकाशी, शाहरुख मोकाशी, संकेत दिंडे यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तीन तास ओढ्यातील पाण्यात उभे राहत मदत कार्य केले. दिनकर दिंडे यांनी वेळेत जेसीबी उपलब्ध केल्याने जखमींना बाहेर काढता आले. वेळेत मदत मिळाल्याने नऊ जणांचे प्राण वाचले. कोकरुड पोलिसांचेही यावेळी सहकार्य मिळाले.

Leave a Comment