सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
पुणे- बंगळुरू महामार्गावर भुईंजनजीक एसटी बस चालकाला चालत्या बसमध्ये चक्कर आल्याची घटना आज दुपारी घडली. पुणे- तासगाव बसच्या चालकाने प्रसंगावधान राखत बस थेट उसाच्या शेतात घातली. त्यामुळे मोठा अपघात टळल असून बसमधील 40 प्रवाशी सर्वजण सुखरूप आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुण्याहून- तासगावला चाललेली एसटी बस भुईंज येथे सर्व्हिस रोडवरून बसस्थानकच्या दिशेने जात होती. यावेळी अचानक चालकाला चक्कर आली. चालक स्टेरिंगवर कोसळणार इतक्यात बस चालकाने रस्त्याच्या बाजूच्या उसाच्या शेतात बस घातली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांच्यात भीतीचे वातावरण होते. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
भुईंज- पाचवड येथील स्थानिक ग्रामस्थांनी अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. बसचालक प्रदीप प्रमोद माताडे (रा. तासगाव, जि. सांगली) यांना उपचारासाठी भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. घटनास्थळी भुईंज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पीएसआय रत्नदीप भांडारे, हवालदार चंद्रकांत मुंगसे, बापूराव धायगुडे, राजेश कांबळे यांनी प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली.