ऊसाच्या ट्राल्यासह ट्रॅक्टर खोल नाल्यात पडल्याने चालक जागीच ठार

Tractor Accident Driver Death
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

ऊसाच्या ट्राल्यासह ट्रॅक्टर खोल नाल्यात पडल्याने त्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गोटेवाडी -भुरभुशी रस्त्यावर गोटेवाडी गावच्या हद्दीत आज पहाटेच्या सुमारास घडली. इंद्रजित जगन्नाथ पाटील (वय- 24, रा. कुठरे, ता. पाटण) असे मृत युवकाचे नाव आहे. कराड तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

पोलिसांची माहिती अशी ः गोटेवाडी – भुरभुशी रस्त्यावर गोटेवाडी गावच्या हद्दीत स्मशानभूमीजवळ ट्रॅक्टर (एम एच- 50 एल- 5749) व त्याला जोडलेली ट्रेलर नाल्यात जावुन अपघात झाला. त्याची माहिती पोलिस पाटील गणपत शेडगे यांना समजली. त्यांनी तातडीने घटनास्थळी जावुन पाहिल्यावर अपघातग्रस्त ट्रॅक्टरचा चालक जागीच ठार झाल्याचे दिसले. त्यांनी तातडीने याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. संबधित ट्रॅक्टर उस वाहतूक करणारा असल्याचे समजल्यावर त्यांनी संबधित साखर कारखान्याशी संपर्क साधुन माहिती घेतली. त्यामध्ये ट्रॅक्टर कुठरे येथील असल्याचे व मृताचे नाव इंद्रजित जगन्नाथ पाटील असल्याचे स्पष्ट झाले. पाटील कुटुंबीयांना याबाबत कळविल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली. उत्तरीय तपासणी नंतर इंद्रजित यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी कुठरे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.